मजुरीचे काम करत दाऊतपुर गावातील दोन तरूण पोलिस झाले.  
बीड

बीड : पोलीस दलात झेपावले राखेच्या तळ्याशेजारील 'दोन फिनिक्स'!

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : आयुष्यभर काबाडकष्ट करून मोलमजुरी करून हाडाची काडं करत आपल्या मुलांना शिकवणाऱ्या प्रत्येक माय-बापाला आपल्या मुलाचे कोणतेही यश हे अभिमान व हुरळून टाकायला लावणारे असते. मात्र विपरीत परिस्थितीत, कोणत्याही सोयी- सुविधा उपलब्ध नसताना अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून मुलांनी मिळवलेलं यश हे सर्व अर्थाने श्रेष्ठच असते. अशाच प्रकारचे उदाहरण दाऊतपुर येथील दोन मजूर कुटुंबांना अनुभवायला मिळाले आहे. परळी तालुक्यातील दोन युवक दाऊतपुर गावातून बनलेले पहिलेच पोलीस असा बहुमान तर त्यांनी मिळवलाच परंतु अतिशय जिद्दीने त्यांनी वर्दी मिळवली आहे. वीटभट्टीवर व राख भरण्याचे काम करणाऱ्या अशा दोन मजूरपुत्रांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

परळी तालुक्यातील दाऊतपुर हे गाव थर्मलच्या राखेच्या तळ्याशेजारी असलेलं गाव आहे. पोलीस दलात झेपावलेले राखेच्या तळ्याशेजारील 'दोन फिनिक्स' असे दाऊतपुर या गावातील दोन युवक अक्षय व अजय एकमेकांचे शेजारी शेजारी आणि पक्के मित्र. सोबतच शिक्षण घेतले, सोबतच जडणघडण झाली, सोबतच काम केले, सोबतच आर्मीची तयारी केली, सोबतच पोलीस भरतीची तयारी केली आणि एकाच वेळी दोघांचीही भरती पोलीस दलात झाली.

स्पर्धा परीक्षेच्या जीवघेण्या या परिस्थितीत अतिशय हालाखीच्या आणि विपरीत परिस्थितीत त्यांनी मिळवलेले हे यश सर्वांसाठीच सुखावह ठरले आहे. अक्षय संतराम बनसोडे याची मुंबई येथे तर अजय आत्माराम कसबे याची कोल्हापूर येथे पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे.अक्षय आणि अजय ही जोडी गावात व त्यांच्या सर्व मित्रांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्षय आणि अजय या दोघांनी परळी येथील साई स्पोर्ट्स अँड डिफेन्स अकॅडमी येथे पोलीस भरतीची तयारी केली. या अकॅडमीचे प्रा. आर. बी. चव्हाण सर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

वर्दीचे लहानपणापासून आकर्षण

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना लहानपणापासून आपल्याला पोलीसच व्हायचे अशा पद्धतीचे स्वप्न या दोन्ही युवकांनी उराशी बाळगले होते. वर्दीचे खास आकर्षण त्यांना होते. त्यामुळे त्यांनी आर्मी प्यारा मिलिटरी अशा सर्व ठिकाणी तयारी करून प्रयत्न केले. मात्र काही पॉईंट ने आर्मी मधील त्यांची भरती होऊ शकली नाही. त्यानंतर लॉकडाऊन काळामध्ये त्यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली. दोघांनीही दोन पोलीस भरत्यानंतर हे यश मिळवले आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असलेली ही दोन्ही कुटुंबे. आर्थिक परिस्थिती बेताची, कोणाचेही मार्गदर्शन नाही. मात्र आपली मुले साहेब व्हावी असे आई-वडिलांच्या डोळ्यातील तळमळीचे दिसणारे सततचे चित्र व त्यांना शिकवण्याची धडपड या सगळ्या मधून प्रेरणा घेत या दोघांनी हे यश मिळवले.

भरतीची तयारी करतांना आई-वडीलांसोबत मजूरीचे काम

अजय व अक्षय मिळेल त्या वेळेत कधी या परीक्षांची व भरतीची तयारी तर मिळेल त्या वेळेत आई-वडिलांना काम करून मदत अशा पद्धतीने या दोघांनीही वाटचाल केली. अखेर या दोघांचीही एकाच वेळी पोलीस दलात निवड झाली. या दोन्ही युवकांच्या या यशाने कुटुंबियांना नवी उमेद व स्वर्गसुख निर्माण करून दिले आहे. विशेष म्हणजे दाऊतपुर या गावात प्रशासनातील विविध विभागांमध्ये कर्मचारी म्हणून नोकरीला अनेक जण आहेत. मात्र आत्तापर्यंत पोलिस दलात कोणीही नोकरीला नव्हते.

अजय- अक्षय या जोडीने गावातून पहिले पोलीस होण्याचा मानही पटकावला आहे. त्याचबरोबर त्यांच्या अविरत कष्ट व मेहनतीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांना व गावकऱ्यांना त्यांच्या या निवडीचा मोठा आनंद वाटत आहे. त्यांचे विविध ठिकाणी सत्कार व कौतुक केले जात आहे.

हा तर पहिला पडाव आणखी झेप घ्यायचीय

विपरीत परिस्थिती असताना जिद्द उराशी बाळगून त्यांनी वर्दीचे बघितलेले स्वप्न अखेरीस पूर्ण झाले असुन याबद्दल आपल्याला समाधान वाटते मात्र भविष्यात मोठे होण्याची पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया अक्षय व अजय यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली.

आमचं जीवन कष्टातच गेलं. थर्मलच्या राख तळ्याशेजारी असणाऱ्या वीटभट्टीवर आम्ही काम करतो.पहिल्यापासूनच मुलाने शिकावे,त्याला नोकरी लागावी असे वाटायचे.त्याने शिक्षण घेतलं मेहनत घेतली व आज पोलीस झाला याचा आभिमान वाटत आहे.
संतराम बनसोडे,अक्षयचे वडील
थर्मलच्या राखेच्या तळ्यातील राख भरण्याचे काम मजूरीने आम्ही करतो.अजय पोलीस झाला याचा आनंद वाटत आहे.आमच्या गावात कोणीच पोलीसमध्ये नव्हते. आभिमानाने उर भरून आला आहे.
आत्माराम कसबे, अजयचे वडील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT