केज : रस्त्यात वाहन उभे करून ते बाजूला घेण्या संदर्भात पोलिसांनी सांगूनही ते वाहन बाजूला न घेतल्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच कारवाई टाळण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. ही कारवाई टाळण्यासाठी पोलिसांसोबत त्याने बराचवेळ हुज्जतपण घातली. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की,दिनांक ३० मे रोजी केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल नितीन जाधव हे शहरात पेट्रोलिंग करीत होते. त्यांना सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई रोडवर संभाजीराजे चौक येथे ट्रक क्र. (एम एच- १४/डी एम- ७३७१) हा वाहतूकीस अडथळा होईल असा रस्त्यातच उभा केला असल्याचे दिसून आले.
याचा चालक अजय बबन इंगळे (रा. रजपुत झोपडपट्टी बेंबळी धाराशिव) याने हा ट्रक सार्वजनीक ठिकाणी बेकायदेशीररीत्या उभा केल्याचे निदर्शनास आले. त्या नुसार वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव यांच्या तक्रारी वरून ट्रक चालक अजय इंगळे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे तपास करीत आहेत.
ट्रक चालक अजय बबन इंगळे याने ट्रक बाजूला घेण्यावरून पोलिसांशी हुज्जत घातली आणि कारवाई टाळण्यासाठी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची शहरात चर्चा आहे.