

केज : केज येथील मुख्य रस्त्यालगत असलेले अडथळे हटवून वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात आणि रहदारीस होत असलेला अडथळा दूर होवून रहदारी सुरळीत व्हायला मदत होऊ शकते.
केज शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्र. ५४८- डी, ५४८- सी या महामार्गालगत असलेल्या व्यापारी आणि व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानाचे बोर्ड रस्त्यावर लावल्याने तसेच फेरीवाले आणि छोटे व्यावसायिक, फळे व भाजी विक्रेते, चिकन व मांस विक्रेते ही रस्त्यावर व्यवसाय करीत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत होता. यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
दरम्यान मागील काही दिवसापूर्वी एका भरधाव वेगातील कंटेनरने अनेक वाहनांना व पादचाऱ्यांना चिरडले होते. त्यात एका महिलेचा जीव देखील गेला आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केज येथे घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकी दरम्यान अनेकांनी या रस्त्यावरील अडथळे व वाहनातून या बाबत प्रश्न उपस्थित केले होते.
यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ही बाब चांगलीच मनावर घेतली असून त्यांनी या बाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आदेश मिळताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्यासह वाहतूक शाखेचे शहा, नितीन जाधव यांनी अडथळे हटविले आहेत. त्यामुळे आता रस्त्यावरील वाहतूक आणि रहदारीला काही अंशी सुरळीतपणा येऊ शकतो.
केज शहरातून दोन महामार्ग जात असल्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची आणि व्यापाऱ्यांचा मालाची आवक जावक असल्याने यावर कायमचा उपाय हा शहराच्या बाहेरून जाणारा रिंग रोड हा पर्याय आहे. रिंग रोडसाठी जमिनी बरोबरच राजकीय ईच्छाशक्ती देखील हवी आणि त्यासाठी नागरिकांनी मागणी आणि उठाव देखील करायला हवा.
पुन्हा व्यावसायीकांनी रस्त्यावर हातगाडे किंवा बोर्ड ठेवले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाही करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नियमांचे उल्लंघन करू नये.
पोलिस निरीक्षक वैभव पाटील