गेवराई : महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास आणि कामगार मंत्रालयामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये ट्रेनी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र दिवाळीत देखील गेवराई तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार ट्रेनी शिक्षकांना पैसे मिळालेले नाहीत. काहींना फक्त सात दिवसांचेच पैसे मिळाले असल्याचे चित्र आहे.
महायुती सरकारने निवडणुकींच्या अगोदर अनेक योजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या ट्रेनी शिक्षक म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या. लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले मात्र गेवराई तालुक्यातील ट्रेनी शिक्षकांवर दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी तालुका गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मानधन मिळाले नसल्याने ट्रेनी शिक्षकांमध्ये नाराजीचा सुर दिसून येत आहे.