

केज : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेक पोस्टवर विदेशी दारू व कार असा १० लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि.२८) स्थिर सर्व्हेक्षण पथकाने दुपारी ३.२० च्या सुमारास करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केज राखीव विधानसभा मतदार संघात मतदार संघाच्या सीमेवर पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे स्थिर निगराणी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. सदर पथके २४ तास महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी त्यांच्या नोंदी करण्याचे काम करीत आहेत.
दरम्यान सोमवारी दुपारी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगावजवळ कळंब-अंबाजोगाई रोडवर ३:२० च्या सुमारास या पथकातील पोलीस हवालदार सत्यपाल कांबळे, अविनाश मोकाशे, पठाण, बोधिकर, हारे, माळी हे कर्तव्य बजावून वाहनाची तपासणी करीत होते. यादरम्यान कृष्णा तुकाराम कोल्हे व बळीराम त्रिंबक कोल्हे दोघे (रा. नायगाव ता के ज. जि बीड) हे दोघेजण कार क्र.(एम एच-४४/ झेड-१५६३) मधून विदेशी दारूची अवैध्यरित्या वाहतूक करत असल्याचे दिसून आले. त्या वाहनात ३५ हजार ५२० रू. किमतीची विदेशी दारू व बियरचे बॉक्स आढळून आले. अवैध्य दारू, बियर आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी यासह १० लाख ३५ हजार ५२० रू. चा मुद्देमाल या पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली.