गेवराई : गेवराई येथील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून जीवन संपवल्याची घटना मंगळवारी घडली. मृतदेह थेट गेवराई आगार प्रमुख यांच्या कार्यालयासमोर ठेवून संतप्त नातेवाईकांनी कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या दिला. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, या पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
मादळमोही (ता. गेवराई) येथील प्रितेश जयराम मोहीते (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रितेश मोहीते सहा महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्वावर एसटी महामंडळात नोकरीला रुजू झाले होते. मात्र, नोकरीच्या काळात त्यांना आगारातील वरिष्ठांकडून सातत्याने त्रास सहन करावा लागत होता. या त्रासाला कंटाळून प्रितेश मोहीते यांनी मंगळवारी (दि. १२) सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले.
मृतदेह शवविच्छेदनानंतर संतप्त नातेवाईकांनी तो आगारप्रमुख यांच्या कार्यालयासमोर आणून ठेवल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर, सहायक पोलीस निरीक्षक दीपक लंके व संतोष जंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांशी चर्चा केली. योग्य चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कारासाठी नेला.
दरम्यान, प्रितेश मोहीते मंगळवारी नेहमीप्रमाणे आगारात हजर झाले होते. तेथून गावी मादळमोही येथे परतल्यानंतर सकाळी दहा वाजता त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.