Beed News : चोरंबा पुलावर एसटी बसने कारला उडवले, एअर बॅग ओपन झाल्याने चार मुले वाचली
ST bus hits car on Choramba bridge
धारूर, पुढारी वृत्तसेवा : खामगाव-पंढरपूर मार्गावर चोरंबा गावाजवळ एसटी बसने कारला धडक देऊन कार मधील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने कारमधील एअरबॅग ओपन झाल्याने चार मुले बचावली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी ११ वाजता घडला.
खामगाव - पंढरपूर या महामार्गावर धारूर शहरापासून दोन किमी अंतरावर अवघड घाट लागतो. या घाटातून प्रवास करताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागते. अरुंद रस्ता, संरक्षण भिंती निकामी झाल्याने तसेच धोकादायक वळण मोठ्या प्रमाणात असल्याने घाटामध्ये अपघाताची मालिका चालू असते. राष्ट्रीय महामार्गावर १२ किमी अंतरात अरुंद रस्ता राहिल्यामुळे व राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या रस्त्यावर वाहनांची संख्या वरचेवर वाढत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
या महामार्गावरील चोरंबा गावाजवळ असलेल्या पुलावर सतत अपघाताच्या घटना घडत असून मागील पंधरा दिवसाखाली अपघात होऊन एक कुटुंब जखमी झाल्याची घटना घडली होती. त्याच पुलावर ९ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर मार्गे माजलगावकडे जाणाऱ्या एसटी बसने तेलगावकडून येणाऱ्या कार ला धडक मारल्याने अपघाताची घटना घडली.
या अपघातामध्ये कारमधील चालक गोपीनाथ देशमुख, ज्योती देशमुख हे गंभीर जखमी झाले तसेच या कार मधील मोहिनी देशमुख ३०, मुले यशराज देशमुख, श्री देशमुख, यशश्री देशमुख, नयन देशमुख असे मुलं बाल बाल बचावले. हे या अपघात झालेल्या कार मध्ये होते.

