सिना धरणाचे अतिरिक्त पाणी मेहकरीत दाखल Pudhari Photo
बीड

Beed News | सिना धरणाचे अतिरिक्त पाणी मेहकरीत दाखल, शेतकऱ्यांचा जल्लोष; आष्टीच्या शेतकऱ्यांची चिंता मिटली!

आमदार सुरेश धसांच्या पाठपुराव्याला मोठे यश : शेतकऱ्यांनी केले जलपूजन

पुढारी वृत्तसेवा

कडा : आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिना मध्यम प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मेहकरी मध्यम प्रकल्पात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९:४५ वाजता सिना प्रकल्पातून दोन्ही पंपांद्वारे सुमारे १६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. हे पाणी मेहकरी धरणात पोहोचताच परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त केला आणि आमदार सुरेश धस यांचे आभार मानले.

यावर्षी सिना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे अतिरिक्त पाणी नदीपात्रातून वाहून जात होते. हे पाणी आष्टी मतदारसंघाला मिळावे, यासाठी आमदार धस यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रशासनाने तातडीने आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली. इतकेच नव्हे, तर पंपाच्या दुरुस्तीसोबतच थकीत असलेले ३६ लाख ८४ हजार रुपयांचे वीजबिलही भरण्यात आले. यामुळे मेहकरी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला.ृ

या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गुणाळे, धाराशिव मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता, उजनी जलविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, बीड जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच विद्युत आणि यांत्रिकीकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी नवनाथ जगताप, कानडी खुर्दचे सरपंच कारभारी गव्हाणे, घोंगडेवाडीचे सरपंच भाऊसाहेब घोडके, उपसरपंच अशोक खराडे, पंडित पोकळे, गणप्रमुख राहुल सुरवसे, गणप्रमुख अतुल खराडे, सीताराम झांजे, संजय माळशिखरे यांच्यासह कानडी खुर्द, पिंपळगाव दाणी, मेहकरी, पुंडी, वाहिरा येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते जलपूजन करून आणि श्रीफळ अर्पण करून आनंद साजरा करण्यात आला.

‘शेतकऱ्यांचे हित साधल्याचे समाधान’ "या पाण्यामुळे मेहकरी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होईल आणि स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाचे मला समाधान आहे. समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर ठामपणे उभा आहे आणि मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन,"
- आमदार सुरेश धस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT