केज : जनावरे खरेदी-विक्री करण्याच्या कारणावरून एकमेकांना बोलत असताना वाद झाला. यादरम्यान शिवीगाळ केल्याच्या कारणावरून जनावरांच्या व्यापाऱ्यांच्या दोन गटात गुरूवारी (दि.१) तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोघांचे डोके फुटले, तर एकाचा हात फ्रॅक्चर झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (दि.१) सकाळी १०:४५ च्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी, साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात रघुनाथ निवृत्ती मोराळे आणि मिर्झा समशेर बेग या दोघा व्यापाऱ्यांमध्ये गाय खरेदीच्या व्यवहारावरून आपसात बोलाबोली झाली. यादरम्यान वाद झाल्याने दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली.त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांना काठ्या आणि दगडाने मारहाण केली. तसेच दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यामुळे बाजारात गोंधळ निर्माण झाला. या मारहाणीत मिर्झा समशेर बेग वय (वय ३२) आणि आशिम तौफीक शेख (वय २१) या दोघांचे डोके फुटले. तर रघुनाथ निव्रत्ती मोराळे ( वय ६०) यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच मिर्झा मुसब्दीक रफीक बेग (वय ३३) आणि नितीन रघुनाथ मोराळे (वय २६) हे दोघे किरकोळ जखमी झाले.
दरम्यान सरपंच कैलास जाधव यांनी ही माहिती पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस जमादार बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक शिवाजी कागदे, पोलीस नाईक, रामहरी भंडाने, वाहतूक शाखेचे गोरख फड हे घटनास्थळी हजर झाले.
पोलीस नाईक रामहरी भंडाने यांच्या फिर्यादीवरून मिर्झा समशेर बेग, आसिम तौफीक मिर्झा, मुसब्दीक रफीक बेग तिघे (रा. नेकनुर ता. जि. बीड) आणि रघुनाथ निवृत्ती मोराळे व नितीन रघुनाथ मोराळे दोघे (रा. दहीफळ वडमाउली ता. केज) या दोन्ही गटातील पाच जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.