आष्टी : तालुक्यातील किन्ही येथील दरोड्याची घटना ताजी असतानाच आणखी एक दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. केरुळ येथील भागवत वस्तीवर दोरडेखोरांनी सोमवारी (दि.३०) मध्यरात्री दोनच्या सुमारास दशहत माजवत सशस्त्र दरोडा टाकला. व एका घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह मुद्देमाल लुटून नेला. या दरम्यान दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करून एकावर चाकूने ९ वार केले. राजू महादेव भागवत (वय ३०) हा तरूण चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील केरुळ येथील टेंभीच्या माळाजवळील राजू महादेव भागवत यांच्या घरामध्ये सोमवारी मध्यरात्री ५ ते ७ दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यांच्याकडे काठी, कुन्हाड, चाकू अशी हत्यारे होती. त्यानंतर या दरोडेखोरांनी लहान मुलासह कुटुंबातील सर्व सदस्यांना काठीने मारहाण करत केली. यादरम्यान विरोध करताना दरोडेखोरांनी राजू भागवत यांना मारहाण करत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्यावर चाकूने ९ वार केल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आष्टी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे हे श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकासह घटनास्थळी धाव घेत घरासह परिसराची पाहणी केली.
गेल्या आठ दिवसापूर्वीच किन्ही येथील केरुळ रोडवरील काकडे वस्तीवर दरोडा पडला होता. यामध्ये जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरत येथील कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली होती. अजून या घटनेचा तपास लागला नसतानाच किन्हीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केरुळ येथे दरोडा टाकण्यात आला आहे.