Beed Repairs to Deepamala to begin soon
बीड, पुढारी वृत्तसेवा : श्री खंडोबा दीपमाळ मंदिरातील ऐतिहासिक दीपमाळेची अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली होती. पावसाळा, ऊन व काळाच्या ओघात ही दिपमाळ झिजत चालली होती. या ऐतिहासिक वास्तूची आजवर कोणत्याही शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती झालेली नव्हती.
त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या अस्तित्व तो वारसा टिकवण्या करिता विश्वस्त मंडळ सतत पुरातत्व खात्याकडे अणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतं अणि तिची अवस्था पाहून नागरिकांत ही चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. आता होत होणार असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे नागरिक ही चिंता मुक्त झालेले आहेत.
बीड शहराजवळ श्री खंडोबा मंदिर आहे. अतिशय पुरातन असलेल्या या मंदिरासमोर दिपमाळ आहेत. या ऐतिहासिक दिपमाळेच्या दुरुस्तीच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून हे काम पुरातत्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम अंदाजे एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने दिपमाळ दुरुस्तीच्या कामाचा दर्जा, पद्धत व तांत्रिक बाबी यावर पुरातत्व विभाग व देवस्थान ट्रस्टी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मंदिराच्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाचा विचार करता दुरुस्तीच्या कामात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना देवस्थान ट्रस्टींकडून देण्यात आल्या आहेत. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर दिपमाळेचे सौंदर्य व सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून मंदिराच्या ऐतिहासिक वैभवात भर पडणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेता दिपमाळेची दुरुस्ती पुरा-तत्व विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. दुरुस्ती करताना मूळ बांधकाम रचना, दगडी कामाची शैली व ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवले जाईल. शास्त्रीय संवर्धन पद्धतीचा अवलंब करून भाविकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे कोषाध्यक्ष रामनाथ खोड यांनी दिली.