

Oil leaked from a vehicle in the Dharur Ghat; several two-wheelers skidded, causing accidents
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर घाटात शनिवारी (दि. ३१ जानेवारी) सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनातून मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाल्याने संपूर्ण रस्ता घसरडा बनला. या ऑइल गळतीमुळे घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला असून अनेक दुचाकी घसरून अपघात झाले. या अपघातांत काही वाहनचालक जखमी झाल्याची माहिती आहे.
धारूर शहराच्या पायथ्याशी सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा अरुंद व वळणावळणाचा घाट असून दररोज या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा घाट अपघातप्रवण म्हणून ओळखला जातो. शनिवारी सकाळी अज्ञात वाहनातून झालेल्या ऑइल गळतीमुळे संपूर्ण रस्त्यावर घसरणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दुचाकीस्वार यांसह चारचाकी वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. ऑइल सांडल्यामुळे काही दुचाकीस्वारांचे वाहन घसरून अपघात झाले.
परिणामी काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे या घटनेची माहिती मिळूनही संबंधित प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुपारपर्यंत रस्त्यावर सांडलेले ऑइल तसेच राहिल्याने अपघातांची मालिका सुरूच होती. यातच घाटातील अरुंद रस्ता, जम्पिंग रोड, निकामी साईट पट्ट्या, मोडकळीस आलेल्या संरक्षण भिंती यामुळे वाहनचालक अक्षरशः हतबल झाले आहेत. या घाटातून प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून जाण्याची वेळ आली आहे.
यापूर्वीही या घाटात अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला असून काहीजण कायमचे अपंग झाले आहेत. मात्र, तरीही रस्त्याच्या सुधारणेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
धारूर घाट की मृत्यूचा सापळा !
प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे धारूर घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. वारंवार ऑइल गळतीचे प्रकार घडत असून अरुंद रस्त्यामुळे हा घाट मृत्यूचा सापळा ठरत आहे. घाटातील समस्या सोडविण्याकडे प्रशासन बेफिकीर राहिल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. घाटाचे रुंदीकरण, संरक्षण भिंती व इतर आवश्यक कामे नेमकी कधी होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा थेट फटका वाहनचालकांना बसत आहे.