Rakshasbhuvan Shani Temple Pudhari
बीड

Shani Amavasya | शनिअमावस्येनिमित्त राक्षसभुवन भक्तिमय; लाखो शनिभक्तांनी घेतले दर्शन

शनिअमावस्येनिमित्त पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा

पुढारी वृत्तसेवा

Rakshasbhuvan Shani Temple devotees

गेवराई : शनिअमावस्येच्या पावन पर्वानिमित्त राक्षसभुवन येथील प्रसिद्ध शनी महाराज देवस्थान भक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले. राज्यासह परराज्यातून आलेल्या सुमारे एक लाख भाविकांनी दिवसभरात शनी महाराजांचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भगवान पुराणिक यांनी दिली.

शनिअमावस्येनिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. “जय शनीदेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. भाविकांनी तेल अभिषेक, पूजा-अर्चा, नवसपूर्ती आणि विविध धार्मिक विधी करत शनी महाराजांचे दर्शन घेतले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी वर्दळ कायम होती.

यंदा तीव्र उष्णतेची लाट आणि कडक उन्हाळा असतानाही शनिभक्तांची श्रद्धा अबाधित असल्याचे चित्र पाहायला मिळाले. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत दर्शनासाठी यावे, असे आवाहन पूर्वीच केले होते. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले होते.

भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थान ट्रस्टने पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था, सावलीसाठी मंडप, वाहनतळ तसेच दर्शन रांगांचे नियोजन केले होते. मंदिर परिसरात स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शनिअमावस्येनिमित्त भरलेल्या यात्रेमुळे परिसरातील व्यापारालाही मोठी चालना मिळाली. फळे, पूजेचे साहित्य, प्रसाद आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर दिवसभर मोठी गर्दी दिसून आली. भक्तांच्या प्रचंड उपस्थितीमुळे संपूर्ण राक्षसभुवन परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT