उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्‍ह्यातील माजलगाव व गेवराई तालुक्‍यातील गावांना भेटी देत दुष्काळी भागाची पाहाणी केली. तर दुसऱ्या छायाचित्रात पावसाअभावी शेतातच करपलेले उभे पीक. pudhari photo
बीड

Sunetra Pawar : शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही; गेवराई, माजलगावात दुष्काळी भागात पाहणी

पुढारी वृत्तसेवा

बीड : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत असताना त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले जाणार नाही. झालेल्या नुकसानाची योग्य ती दखल घेऊन, सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि टंचाईची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्यांनी दौर्‍यादरम्यान माजलगाव व गेवराई तालुक्यातील विविध गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

राज्यातील एकूण 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी हे सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाकडून खालीलप्रमाणे विविध विशेष उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दौरादरम्यान पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव, वारोळा, धर्मेवाडी तसेच गेवराई तालुक्यातील सिरसदेवी या गावांना भेट दिली. माजलगाव तालुक्यातील माली पारगाव येथील शेतकरी पद्माकर शिंदे यांच्या शेतात जाऊन त्यांनी अतिवृष्टी व दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच धर्मेवाडी गावातील शिवार व पिकांच्या परिस्थितीची पाहणी करून शेतकरी बांधवांशी सविस्तर संवाद साधला.

यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रकाश सोळुंके, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आ.राजेश विटेकर, आ.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार अमरसिंह पंडित, अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण, रमेश आडसकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साळवे, पशुसंवर्धन उपसंचालक कदम यांच्यासह तहसीलदार रुईकर, तालुका कृषी अधिकारी बादाडे, मंडळ कृषी अधिकारी खेडकर आणि माली पारगावच्या सहायक कृषी अधिकारी ऋतुजा पेंदाम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी खचून जावू नये

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील शेतावर जाऊनही त्यांनी तेथील पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना पाहून, त्यांनी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच शेतकर्‍यांनी खचून न जाता हिंमत ठेवावी, हे सरकार पूर्णपणे आपल्यासोबत आहे, असे सांगत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT