Parli Tukaram Munde Rescued
परळी वैजनाथ : परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीत उलगडा करत अपहृत तुकाराम पंढरीनाथ मुंडे यांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींनी तब्बल पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जूनरोजी पहाटे परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून तुकाराम पंढरीनाथ मुंडे (वय 54, रा. सांगम, ता. परळी) यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. या घटनेप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बेंटवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी करून आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा मागोवा घेतला. तपासादरम्यान वाहनाचा माग काढत पथक अमरावतीपर्यंत पोहोचले.
अधिक चौकशीत अपहृत तुकाराम मुंडे यांना अमरावती जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडून दिल्याचे उघड झाले. तपासादरम्यान आरोपींनी पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण केल्याची बाब समोर आली.
या प्रकरणात सचिन नारायण वंजारे, संतोष नारायण वंजारे (दोघे रा. परळी), अल्केश विष्णुजी अवजाडे आणि शुभम राजू पिंपळकर (दोघे रा. अमरावती) यांची नावे निष्पन्न झाली. यातील संतोष नारायण वंजारे याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून संपूर्ण कटाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी नागपूर, मध्यप्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथे शोधमोहीम राबवत उर्वरित आरोपींनाही अटक केली.
सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून परळी ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चेतना तिडके-मेंढे आणि अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बेंटवाड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतके तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.