परळी वैजनाथ : गाढेपिंपळगाव येथील आरसुळे वस्तीवरील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असल्याची बातमी 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. या वृत्ताची गंभीर नोंद घेत मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली.
शनिवारी दुपारी जिल्हा परिषद, बीडच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गाढेपिंपळगाव येथील नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पुलाच्या प्रस्तावासाठी आवश्यक मोजमापही करण्यात आले असून, लवकरच पुलाच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
आरसुळे वस्तीवरील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात नदीच्या प्रवाहातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे शिक्षण व दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता. या गंभीर प्रश्नाला 'पुढारी' ने वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, 'पुढार'मुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुलाच्या प्रश्नाला गती मिळाल्याबद्दल आरसुळे वस्तीवरील रहिवासी तसेच गाढेपिंपळगाव ग्रामस्थांनी पुढारीचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. ग्रामस्थांनी लवकरात लवकर पुलाचे काम मंजूर करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.