

Confusion in the bank over loan waiver inquiry
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कर्जमाफीची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याशी कथित गैरवर्तन झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादाचे गुन्ह्यात रूपांतर झाले आहे. शाखाधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी बँकेत गेलेल्या नऊ शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून संबंधित शाखाधिकारी हितेश दामोर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बळीराम नारायण खरात हे २८ जुलै रोजी आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत वडिलांच्या नावावरील पीककर्ज कर्जमाफी योजनेत समाविष्ट झाले आहे का, याची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शाखाधिकारी हितेश दामोर यांनी "वडिलांना घेऊन या" असे सांगितल्याचा आरोप आहे. त्यावर संबंधित शेतकऱ्याने वडील मयत झाल्याचे सांगितले असता, "वरून घेऊन या" अशा स्वरूपाचे वक्तव्य करत अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम सोळंके यांच्यासह काही शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते शाखेत गेले. शाखाधिकाऱ्याला जाब विचारताना दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादानंतर शाखाधिकारी हितेश दामोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम सोळंके, शिवशक्ती आढाव, असेफ कच्छी, रवी लोंढे, मुजीबराज शेख, रमेश थोरात, रामेश्वर खुळे, भाऊ खरात आणि सचिन घुगे यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, रवी लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीत शाखाधिकारी हितेश दामोर यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यानुसार त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाखाधिकाऱ्याची मग्रुरी
वडिलांच्या नावावरील पीककर्ज कर्जमाफी योजनेत समाविष्ट झाले आहे का, याची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शाखाधिकारी हितेश दामोर यांनी "वडिलांना घेऊन या" असे सांगितल्याचा आरोप आहे. त्यावर संबंधित शेतकऱ्याने वडील मयत झाल्याचे सांगितले असता, "वरून घेऊन या" अशा स्वरूपाचे वक्तव्य करत अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.