Beed News : ओपीडी सुरू झाली, 'ओटी'ही सुरू होणार ! file photo
बीड

Beed News : ओपीडी सुरू झाली, 'ओटी'ही सुरू होणार !

बीड : माता-बाल रुग्णालयाची सुसज्ज इमारत रुग्णांसाठी खुली

पुढारी वृत्तसेवा

Beed News: OPD has started; the OT will also become operational

बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कोट्यवधी रुपये खर्च करत उभारलेली जिल्हा माता बाल संगोपन रुग्णालयाची इमारत अखेर रुग्णांसाठी खुली झाली आहे. या ठिकाणी सध्या ओपीडी, सोनोग्राफी सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून तपासणीसाठी गेलेल्या नमुन्यांचा अहवाल येताच ऑपरेशन थिएटर देखील कार्यान्वित होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी दिली.

बीड जिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येण्याबरोबरच अनेकदा रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागायचे. यातही महिला व बालकांची संख्या मोठी असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागायचा. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा माता व बालसंगोपन रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या सुसज्ज इमारतीचा उपयोग मात्र रुग्णांसाठी करता येत नव्हता. फर्निचर व लिफ्टचे काम न झाल्याने अडचणी येत होत्या.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके, डॉ. नागेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली होती व संबंधितांना काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार काम गतीने पूर्ण झाल्याने आता या ठिकाणी ओपीडी सुरू करण्यात आली आहे तसेच लवकरच ऑपरेशन थिएटरदेखील कार्यान्वित होणार असल्याचे डॉ. सोळंके यांनी सांगितले.

रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील

जिल्हा रुग्णालयात महिला व बालकांसाठी सुसज्ज असे वॉर्ड होते, परंतु रुग्णांची संख्या मोठी असल्याने अडचणी येत होत्या. आता या दोन्ही घटकांसाठी नवीन सुसज्ज इमारत उपलब्ध झाली आहे त्यामुळे या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळू शकणार आहेत. यासाठी डॉ. सोळंके व त्यांची टीम अविरतपणे प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT