

जालना : प्रेमप्रकरणातून आई-वडिलांनी टाकलेल्या आणि समाजाने दूर लोटलेल्या अल्पवयीन मुलींची काळजी आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे, त्याच यंत्रणेने निष्ठूरपणा दाखवावा. ही घटना लाजीरवाणी आहे.जेवण केल्यानंतर झालेल्या त्रासामुळे त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी पीडितांच्या भेटीतून ही बाब उघड झाली. त्यांनी या राजगृहात होत असलेल्या त्रासाबद्दलची आपबीती दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीसोबत कथन केली.
दरम्यान, जालना जिल्ह्यात मुलींचे बालगृह नसल्याने या चार मुलींची तात्पुरती सोय अंबड चौफुली येथील शांतीकुंज शासकीय महिला राज्यगृह येथे केली. या मुलींनी प्रेमप्रकरणातून घर सोडले होते. त्यामुळे त्यांच्याकडे पालक देखील नीट बघत नाही. परिणामी, त्यांच्या वेदना, दुःख त्या गिळून घेतात. शिवाय, त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोणही फारसा चांगला नसल्याने याचाच फायदा राज्यगृहातील यंत्रणेने घेतला, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या राज्यगृहात एकूण २९ महिला आहे. यापैकी चार मुली अल्पवयीन आहेत. यात एक मुलगी गर्भवती आहे. रविवार, दि. २१ रोजी त्यांना जेवनात अंड्डे आणि चिकन देण्यात आले होते. जेवण केल्यानंतर या चार मुलींना अचानक मळमळ, चकरा आणि पोट दुखू लागले. यामुळे राज्यगृहाच्या सुरक्षा रक्षकांनी तीन मुलींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
गर्भवती असलेल्या एकीला जिल्हा महिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची मंगळवार, दि. २३ रोजी भेट घेतली असता त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.
येथील यंत्रणेतील कर्मचारी आम्हाला नीट वागणूक देत नाही. आमच्याकडून किचनमध्ये कामे करुन घेतात. आम्हाला कोंडून टाकतात. तुम्ही येथून कशा जाताल, हे मी बघते, अशा धमक्या देत असतात, असे सांगून सोडण्यासाठी पालकांकडून पैसे देखील घेत असल्याचा आरोप त्यांनी केला
दरम्यान, या संदर्भात रुग्णालयात दाखल केस पेपरची चौकशी केली असता त्यात त्या मुलींना अन्नातून विषबाधा झाला नाही, असे दिसून आले. चौघींनाही फिट, मानसिक आजारातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी या केसपेपरवरून दिसून आलेे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन पवार यांच्याकडे तो केसपेपर निरीक्षणासाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, जिल्हा सामान्य रुग्णालयात या तिघींना दाखल केले, त्यावेळी त्या बेशुध्द अवस्थेत होत्या. असे त्या मुलींनी सांगितले. या प्रकारावर जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग काय भूमिका घेते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नॉट रिचेबल
या संदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. व्ही. कड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल आला.
अन्नातून विषबाधा झाली नाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्या मुलींना काल भेटलो आणि आज पण भेटून आलो आहे. त्यांना मळमळ होत होती. त्यांचे पोट दुखत होते. त्यांना अन्नातून विषबाधा झाली नाही. डॉक्टरांशीही याबाबतीत चर्चा केली आहे. डॉक्टरांनी देखील मानसिक तणावातून हा प्रकार झाल्याचे सांगितले.
ॲड. उमेश कुटे, विधी सल्लागार, राज्यगृह, जालना.
काळजी आणि संरक्षणपात्र मुलींसंदर्भात राज्यगृहात असा प्रकार होत असेल तर ही बाब गंभीर आहे. या संदर्भात जिल्हा पोलिसप्रमुख तेघबिर सिंग संधू आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कुलकर्णी या दोघाही वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि आवश्यक गुन्हे दाखल करावेत.
संजय लाखेपाटील, सदस्य, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग.