Beed News: Only 11.11 percent water reserves left in projects in Beed district!
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होत असून जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 11.11 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 12 नोव्हेंबरच्या पाणी साठा अहवालातून ही चिंताजनक स्थिती समोर आली आहे. जिल्ह्याचा एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या माजलगाव धरणातही अवघा 19.71 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थिती आणखी बिकट आहे.
जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 767.53 दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी सध्या केवळ 85.29 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. माजलगाव धरणाची उपयुक्त साठवण क्षमता 312 दशलक्ष घनमीटर असून, सध्या धरणात 61.5 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 19.71 टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात हा साठा 65 दशलक्ष घनमीटर होता.
आठवडाभरात त्यात घट झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील 17 मध्यम प्रकल्पांची एकूण क्षमता 167.04 दशलक्ष घनमीटर असून, त्यामध्ये सध्या केवळ 13.66 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 8. 18 टक्के पाणी आहे. ऊर्ध्व कुंडलिका धरणात 15.87 टक्के, कुंडलिकामध्ये 17.37 टक्के, मेहकरीमध्ये 12.40 टक्के, तर वाण धरणात 11.41 टक्के पाणीसाठा आहे. बिंदुसरा धरणात 2.81 टक्के, तर सिंदफणा धरणात अवघा 0.38 टक्के साठा उरला आहे. बेलपारा, महासांगवी, कडा, कडी आणि रुटी यांसह अनेक मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.
लघु प्रकल्पांची अवस्था तर अधिकच चिंताजनक आहे. जिल्ह्यातील 146 लघु प्रकल्पांची एकूण क्षमता 288.49 दशलक्ष घनमीटर असून, या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 10.12 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 3.51 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
दिवसेंदिवस प्रकल्पांमधील पाणीसाठा घटत असल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी आणि शेतीच्या गरजांचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे नियोजन, काटकसरीने वापर आणि संभाव्य टंचाईग्रस्त भागांसाठी वेळेत पर्यायी उपाय-योजना करणे आवश्यक बनले आहे. जिल्ह्यातील नागरि-कांनीही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.