गेवराई: आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाशराव सोळंके यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्याविरोधात गेवराईत संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचे संतप्त पडसाद रविवारी शहरात उमटले. काही संतप्त युवकांनी प्रा. हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यापूर्वी पुतळ्याला दंडुक्याने मारहाण करून पायाखाली तुडवण्यात आले. या प्रकारानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
या घटनेनंतर, सोमवारी प्रा. हाके यांनी "ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला, त्याच ठिकाणी मी दुग्धाभिषेक करून चहा पिणार," अशी घोषणा करत एकप्रकारे आव्हानच दिले. त्यानुसार, ठरलेल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही बाजूचे समर्थक मोठ्या संख्येने जमल्याने तणाव निर्माण झाला.
प्रा. हाके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचताच, जमावातून त्यांच्या दिशेने अचानक दगड आणि चपला फेकण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी तात्काळ प्रा. हाके यांच्या वाहनाला संरक्षणकडे देत त्यांना शहराबाहेर सुरक्षितपणे पोहोचवले. सध्या गेवराई शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.