FDA Maharashtra 
बीड

Majalgao FDA Action : सुट्टे तेल आढळल्याने दुकानाचे परवाने रद्द ; माजलगावमधील तेल व्यापारी राठोर बंधुच्या दुकानावर FDAची कारवाई

अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : ‘सेफफुड सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यातील तेल रीपॅकिंग व विक्री केंद्रांवर ६ व ७ ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली. या कारवाईत बीड एमआयडीसीसह वडवणी आणि माजलगाव येथील पाच आस्थापनांवर कारवाई केली. दरम्यान तब्बल १,१९,१८७.५ किलो खाद्यतेल, अंदाजे १ कोटी ९४ लाख ५० हजार ९२२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित सर्व आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करून ती बंद करण्यात आली आहेत.

बीड एमआयडीसीतील स्वागत ऑईल इंडस्ट्रीज येथे मोठ्या प्रमाणात वापरलेले टिन पुन्हा वापरणे, एकाच टाकीतील तेल वेगवेगळ्या नावाने विक्रीसाठी लेबल करणे, अस्वच्छता, इन-हाऊस लॅब व COA चा अभाव, तांत्रिक व्यक्ती तसेच आवश्यक प्रमाणपत्रे आणि कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड नसल्याचे आढळले. येथे ६६,६५२.६ किलो, १ कोटी ५ लाख ८५ हजार २३६ रुपये किमतीचे तेल जप्त करून १० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

याच दिवशी बीड एमआयडीसीतील चरखा ऑईल मिल येथेही अनियमितता आढळून ४५,९९५.७ किलो, ७८ लाख २२ हजार ५० रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले. या ठिकाणाहून ११ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी वडवणी येथील जय हनुमान ट्रेडर्स येथून ४,५४५.२ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.

दरम्यान, माजलगावातील जुना मोंढा परिसरातही FDA ने कारवाई केली. जान्हवी कमर्शियल्स येथून बॅच क्रमांक व लेबल नसलेले १,७४६ किलो सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल, तर विनायक ऑईल इंडस्ट्रीज येथून २४८ किलो सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. या दोन्ही आस्थापनांचे परवानेही तत्काळ निलंबित करून व्यवसाय बंद करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्रीकांत करकळे व सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने केली. जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT