Maharashtra FDA raid: अन्न व औषध प्रशासन विभागाचा राज्यभर कारवाईचा धडाका! जून महिन्यात तब्बल ३४ ठिकाणी छापे

४.१२ कोटी रुपयांची बेकायदेशीर औषधे आणि सौंदर्यप्रसाधने जप्त
Maharashtra FDA raid
Maharashtra FDA raidPudhari File Photo
Published on
Updated on

Maharashtra FDA raid

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जून २०२६ या महिन्यात राज्यभरात बेकायदेशीर औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. राज्याच्या विविध भागांत तब्बल ३४ ठिकाणी धडक धाडी टाकून प्रशासनाने तब्बल ४ कोटी १२ लाख रुपयांचा साठा जप्त आणि प्रतिबंधित केला आहे. या कारवाईमुळे औषध व सौंदर्यप्रसाधने क्षेत्रातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांसह भेसळदारांचे धाबे दणाणले आहेत.

विनापरवाना निर्मिती आणि विक्रीवर मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या पथकाने १५ वेगवेगळ्या ठिकाणी विनापरवाना औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या बेकायदेशीर उत्पादन व विक्री अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत २ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Maharashtra FDA raid
FDA Raid: आयुक्तपदी तुकाराम मुंडे येताच अन्न प्रशासनाला आली जाग

'वैद्यकीय उपकरण नियम २०१७' चे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई

तसेच, 'वैद्यकीय उपकरण नियम २०१७' चे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, १ कोटी २६ लाख रुपये किमतीच्या वैद्यकीय उपकरणांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

सौंदर्यप्रसाधने आणि आक्षेपार्ह जाहिरातींवर अटकाव

बाजारामध्ये ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या चुकीचे लेबल लावलेल्या सौंदर्यप्रसाधनांवर ३ ठिकाणी धाडी टाकून ३३.२६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. यासोबतच, औषधांच्या संदर्भात खोट्या आणि आक्षेपार्ह जाहिराती करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या ८ ठिकाणांवर कारवाई करत २.२७ लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत.

Maharashtra FDA raid
HSRP Number Plate : वाहन चालकांनो सावधान...‘एचएसआरपी’ नसल्यास आजपासून होणार कारवाई!

९ गुन्हे दाखल, २ आरोपींना अटक

या संपूर्ण मोहिमेदरम्यान नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जून महिन्यात एकूण ९ एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

औषधे व सौंदर्यप्रसाधनांच्‍या ७८७ नमुन्‍यांपैकी ३५ निकृष्‍ट

FDA ने जून महिन्यात राज्यभरातून औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे एकूण ७८७ नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. प्रयोगशाळेतील तपासणीअंती ७५२ नमुने प्रमाणित (मानकानुसार) आढळले.३५ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले आहेत.निकृष्ट दर्जाचे घोषित करण्यात आलेल्या औषधांच्या संबंधित बॅचेस बाजारातून तातडीने मागे घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, संबंधित उत्पादक, वितरक आणि परवानाधारकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news