अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने स्वतःच्या मुलीवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती अजितकुमार भस्मे यांनी दिलेल्या या कठोर निर्णयामुळे अशा कृत्यांना आळा बसावा, असा संदेश या निकालातून मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत उसतोडीसाठी गेली असताना, अचानक पोटदुखीमुळे डॉक्टरांकडे गेली. तपासणीत ती गरोदर असल्याचे समजले. आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर मुलीने सांगितले की, तिचा वडील बाळु उर्फ बाळासाहेब महादेव गायकवाड हा गेल्या सात-आठ महिन्यांपासून दारूच्या नशेत, आई घरी नसताना, तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. यामुळे ती गरोदर राहिली होती. या धक्कादायक माहितीच्या आधारे पीडितेने ७ फेब्रुवारी २०२४ रोजी धारूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पीएसआय प्रकाश शेळके यांनी केला. न्यायालयात सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण फड यांनी बाजू भक्कमपणे मांडली. एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात पीडित मुलगी, तिची आई आणि डीएनए तज्ज्ञ यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. सर्व पुरावे आणि साक्षांच्या आधारे आरोपीचे कृत्य सिद्ध झाले. न्यायालयाने आरोपीचे कृत्य अत्यंत अमानवी आणि दुर्मिळ असल्याचे नमूद करत, त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून, अशा कृत्यांना कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वास पीडित मुलगी आणि तिच्या आईने व्यक्त केला.
सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांनी पीडितेस न्याय मिळवून दिल्याबद्दल विविध सामाजिक संघटना आणि वकील संघटनेने त्यांचे अभिनंदन केले आहे. या निकालामुळे भविष्यात अशा अमानवी कृत्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा निकाल समाजात कठोर संदेश देणारा ठरला असून, अशा गुन्ह्यांना मुळापासून आळा बसावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.