

Ambajogai cremation land issue
अंबाजोगाई: शहरातील लिंगायत समाजाला अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी करत आज (दि. २७) समाजबांधवांनी मृतदेहासह थेट नगर परिषद कार्यालयात ठिय्या दिला. सकलेश्वर मंदिराजवळील पारंपरिक स्मशानभूमी पुरातत्व विभागाने ताब्यात घेतल्याने समाजाला अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
माजी कार्यालयीन अधीक्षक गणपत वाघमारे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने समाजबांधवांनी मृतदेह नगर परिषद कार्यालयात आणून प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले. बराच वेळ आंदोलन सुरू असताना कोणताही नगर परिषद कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही, यामुळे संतप्त समाजाने प्रशासनाचा निषेध नोंदवला.
दरम्यान, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आंदोलनस्थळी भेट देत समाजबांधवांशी संवाद साधला. त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांत स्मशानभूमीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मोदी यांच्या मध्यस्थीवर विश्वास ठेवून समाजाने आंदोलन स्थगित केले आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लिंगायत समाजाच्या वतीने राजकिशोर मोदी यांचे आभार मानण्यात आले असून, स्मशानभूमीच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.