

गेवराई: तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पिक विमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून, अवघे दोनच दिवस शिल्लक असताना तालुक्यातील केवळ ५० टक्क्यांपेक्षा कमी शेतकऱ्यांनीच पिक विम्याचे कवच घेतले आहे. शेतकरी हिस्सा वाढल्याने विमा भरण्यास उत्साह कमी झाल्याचे दिसून येत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना शासनाकडून राबवली जाते. गेवराई तालुक्यात यंदा ९० टक्क्यांहून अधिक खरिप पेरणी झाली आहे. मात्र, यंदा विमा रक्कमेचा पोटहिस्सा शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागत असल्याने सहभागात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी जवळपास तीन लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यंदा मात्र, आतापर्यंत केवळ १ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी सुमारे ५० हजार हेक्टरवरील पिकांचे विमा संरक्षण घेतले आहे. नियोजनानुसार सव्वा लाख हेक्टर क्षेत्रासाठी विमा अपेक्षित असताना, शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चकलांबा - १४,१०२
धोंडराई - ६,००८
गेवराई - ७,५४०
जातेगाव - ११,५८०
कोळगाव - ११,०३०
मादळमोही - १०,५९५
पाचेगाव - ११,६५०
पाडळसिंगी - ९,६५५
रेवकी - ७,०९३
सिरसदेवी - १७,५६४
तलावाडा - १४,८०३
उमापूर - ८,०९९
"नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा भरून संरक्षण घ्यावे. अजून दोन दिवस शिल्लक आहेत, तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचे कवच घ्यावे."
किरण विरकर, तालुका कृषी अधिकारी, गेवराई
सलग दोन वर्षे पिक विमा भरूनही भरपाई मिळाली नाही, अशी नाराजी शेतकऱ्यांत आहे. यंदा भरल्यानंतर भरपाई मिळेल की नाही, यावर विश्वास राहिलेला नाही."
भास्कर यादव, शेतकरी, सेलू