Beed News : टाकरवन परिसरात ७२ तासांपासून अंधार file photo
बीड

Beed News : टाकरवन परिसरात ७२ तासांपासून अंधार

मुख्य ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ

पुढारी वृत्तसेवा

Beed News: Darkness in Takarvan area for 72 hours

टाकरवन, पुढारी वृत्तसेवा : टाकरवन येथील 33 केव्ही उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर जळाला असल्यामुळे टाकरवनसह परिसराला होणारा वीज पुरवठा गेल्या 72 तासांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच टाकरवन येथील सर्व वीज उपकेंद्रावर चालणारे व्यवहारदेखील ठप्प झाले आहेत.

माजलगाव तालुक्यातील टाकरवन या ठिकाणी 33 केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातील टाकरवनसह परिसरातील गावांना वीजपुरवठा करणारा मुख्य ट्रान्सफॉर्मर जळाला असल्या कारणास्तव सर्व वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे. गत 72 तास लोटले आहेत.

तरी अद्याप या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याकडून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाले आहे. मुख्य ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बसवण्याकरिता अधिकचा वेळ लागत असल्याचे सांगितले जात आहे.

या परिसराचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित मुख्य ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे फोन द्वारे केली असता त्यांनी लवकरात लवकर हा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरवठा करतो अशी ग्वाही दिली असल्याची माहिती टाकरवन ग्रामपंचायतची उपसरपंच दयानंद गोबरे यांनी दिली.

पुन्हा डोक्यावर आला हंडा.!

टाकरवन या ठिकाणी गत 72 तासांपेक्षा अधिक तास लोटले आहेत तरी अद्यापही वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे नागरिकांपुढे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत पंप चालत नसल्याने विहीर व हातपंपावरून पाणी आणण्याची वेळ टाकरवन व परिसरातील महिलांवर आली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके व गेवराई मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागात वीजपुरवठ्याची समस्या

पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागात वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक वर्षांपासूनचे जुने खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलल्या गेल्या नाहीत. यामुळे वादळी वाऱ्यात खांब कोसळणे, तारा तुटणे अशा घटना घडतात. याबरोबरच तारांजवळ वाढलेल्या झाडांमुळे देखील अडचणी येतात. यावर पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे होते, परंतु तसे झालेले नसल्याने अडचणीत भरच पडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT