Beed News : गोरक्षनाथ टेकडीवर दर्शनासाठी भाविकांची गर्दी file photo
बीड

Guru Purnima : गोरक्षनाथ टेकडीवर दर्शनासाठी भाविकांची गर्दी

तालुक्यातील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Beed News: Crowd of devotees at Gorakshnath Hill for darshan

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

बुधवारी पहाटे पाच वाजता गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गोरक्षनाथ महाराज, साधूबाबा महाराज, सद्गुरू किसन बाबा महाराज तसेच गुरुमाऊली दत्तात्रय यांची आरती करण्यात आल्या.

दिवसभर भाविकांनी टाळ, मृदंग आणि वीणेच्या गजरात गर्भगिरी पर्वताची प्रदक्षिणा करून भक्तिमय वातावरण अनुभवले. गुरु-शिष्य परंपरा जपणाऱ्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन शिष्यांना गुरुमंत्र देण्याचा सोहळा पार पडला. सकाळी 7 ते 8, 9 ते 10 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या हस्ते हजारो भाविकांनी गुरुमंत्र स्वीकारला. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कीर्तनात पांडुरंग महाराज उगले यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले.

त्यांनी सांगितले की, गोरक्षनाथ टेकडी ही गुरू-शिष्य परंपरेची पवित्र गादी असून गुरू मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, साधूबाबा, सद्गुरू किसन बाबा आणि शांतीब्रह्म नवनाथ बाबा अशी अखंड परंपरा आजही जपली जात आहे. आज गोरक्षनाथ टेकडीवर दिसणारे वैभव हे सद्गुरू किसन बाबा आणि शिष्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा यांच्या त्याग, तपश्चर्या आणि सेवेमुळेच उभे राहिले आहे, असे त्यांनी अभंग विवेचनातून सांगितले.

गुरु पौर्णिमेनिमित्त बकरवडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यासाठी 8 क्विंटल 50 किलो बुंदी आणि 15 पोते चिवडा तयार करण्यात आला होता. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT