Kaij Burglary | केजमधील माजी सैनिकाच्या घरफोडीचा २४ तासांत छडा: आरोपी जेरबंद ; ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Kaij Burglary Suspect Arrested
Kaij Burglary Suspect ArrestedPudhari
Published on
Updated on

Kaij Burglary Suspect Arrested

केज : केज शहरातील फुलेनगर परिसरात माजी सैनिकाच्या घर व दुकानात झालेल्या पाच लाखांहून अधिकच्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला जेरबंद केले. आरोपीकडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माजी सैनिक दिनकर देविदास विडेकर यांचे फुलेनगर परिसरात घर व दुकान आहे. त्यांचा मुलगा गजानन हा व्यवसायानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याने दिनकर विडेकर आणि त्यांच्या पत्नी शशिकला हे २७ जुलै रोजी घर व दुकानाला कुलूप लावून मुलाला भेटण्यासाठी गेले होते. परत येण्यास विलंब झाल्याने ते तेथेच मुक्कामी थांबले.

Kaij Burglary Suspect Arrested
Beed Crime News : बीडमध्ये संस्थाचालकाकडून कर्मचाऱ्याच्या पतीला मारहाण

याच संधीचा फायदा घेत २८ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी चॅनल गेटचे तसेच हॉलचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करत गल्ल्यातील ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच घरातील किचनमध्ये ठेवलेले पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, अडीच तोळ्यांचे सोन्याचे मणी गंठण, चांदीचे दोन ग्लास, दोन वाट्या, चांदीची चैन असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या चोरीत एकूण ५ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

या प्रकरणी दिनकर विडेकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८१/२०२६ दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने तपास करत होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा ऋषिकेश दिलीप काळे (रा. फुलेनगर, केज) याने केला आहे. त्यानुसार उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस हवालदार बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, महेश जोगदंड, जफर पठाण आणि चालक गणेश मराडे यांच्या पथकाने आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

Kaij Burglary Suspect Arrested
Beed crime : लाचखोर सरपंचावर अपात्रतेची कारवाई ; विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

चौकशीत आरोपीने चोरी केलेली रक्कम व दागिने घरातच लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचांसमक्ष आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी २ लाख ८१ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ७४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास केज पोलीस करीत आहेत.

श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांचीही मदत

घरफोडीचा तपास जलदगतीने लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बीड येथून श्वान पथकाला पाचारण केले होते. तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी घटनास्थळावरील विविध वस्तूंवरील ठसे संकलित करून तपासाला महत्त्वाची मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news