केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव येथील सराईत गुन्हेगार विकास ऊर्फ बबन गोरे याच्या विरुद्ध पोलिस प्रशासनाने संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत (एम पी डी ए ) अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
केज तालुक्यातील माळेगाव येथील विकास ऊर्फ बबन साहेबराव गोरे याच्यावर युसुफवडगांव पोलिस ठाण्यात घरात घुसुन मारहाण करणे, जबरी बलात्कार करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गंभीर स्वरूपाच्या पाच गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्याचे वर्तन सुधारावे; या करीता त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. तरीसुध्दा त्याच्या वर्तनात आणि गुन्हेगारी कृत्यामध्ये सुधारना झाली नाही.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सुचने वरुन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी विकास साहेबराव ऊर्फ बबन गोरे (रा. माळेगांव ता. केज) यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी एम पी डी ए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्या बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकारी बीड यांना सादर केला होता.
जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दि. २० डिसेंबर रोजी या प्रकरणाच्या अनुषंगाने एम पी डी ए कायद्या अंतर्गत आदेश पारीत करून विकास ऊर्फ बबन गोरे याला तात्काळ ताब्यात घेवून त्याची रवानगी कारागृहात करण्याचे आदेश दिले.
त्यावरून जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे आणि स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. सदर आदेशा वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथे हर्सूल.कारागृहात हजर करुन त्याला स्थानबध्द केले आहे.