Beed News: BJP's success in the municipal elections; fireworks display in Wadwani and Dharur
वडवणी / धारूर । पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांपैकी तब्बल २५ ते २६ महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टनि मिळवलेल्या घवघवीत यशाचा आनंद वडवणी व धारूर शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनी सांगितले की, विकासाभिमुख राजकारण, पारदर्शक प्रशासन व जन-तेशी असलेला थेट संवाद यामुळेच भाजपाला हे यश मिळाले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या जनहिताच्या योजनांमुळे वडवणीसह संपूर्ण परिसराचा विकास वेगाने साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, धारूर शहरातही भाजपच्या विजयाचा आनंद जल्लोषात साजरा करण्यात आला.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यालयासमोर कार्यकर्ते एकत्र आले. त्यानंतर काशिनाथ चौक, क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
रॅलीदरम्यान फटाके वाजवत, पेढे वाटत व घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या विजयामुळे राज्यातील जनतेने भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त केल्याची भावना दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण तसेच माजी मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाबद्दल यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
या आनंदोत्सवात वडवणी व धारूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.