बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांत सुरू असलेले आरोप - प्रत्यारोप, क्षीरसागर बंधुंनी एकत्र येण्याचे दिलेले संकेत यामुळे बीड नगरपालिकेत सत्ताबद्दल होणार का? असा प्रश्न चर्चीला जात असतांनाच आता राष्ट्रवादी काँग्रेसची बीड नगरपालिकेच्या सत्तेतील घडी पक्कीच असल्याचे समोर आले आहे. नगराध्यक्षा प्रेमलता पारवे याच पाच वर्ष नगराध्यक्षपद भूषवतील व उपाध्यक्षही राष्ट्रवादीचाच राहणार असल्याचे आ.विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे.
बीड नगरपालिका गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यात राहिलेली आहे. गतवर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र मोठा फेरबदल बीड शहराच्या राजकारणात पहायला मिळाला. तत्कालिन पालकमंत्री स्व.अजित पवार यांनी बीडवर विशेष लक्ष केंद्रीत करत बीडची नगरपालिका राष्ट्रवादीच्याच ताब्यात रहावी यासाठी आ.विजयसिंह पंडित यांच्यावर जबाबदारी दिली होती.
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळे अचानकपणे आलेली जबाबदारी आ.विजयसिंह पंडित यांनी स्वीकारली. उमेदवार निवडीतील अचुकतेबरोबरच स्व.अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादीची सत्ता बीड नगरपालिकेत आली. नगराध्यक्षपदी प्रेमलता पारवे या विराजमान झाल्या, तर काठावर बहुमत असतानादेखील राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्व सभापती झाल्याचे पहायला मिळाले.
बीडमध्ये बदल दिसावा, विकासकामे मार्गी लागावीत अशी बीडकरांची अपेक्षा राष्ट्रवादीकडून होती, त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू झाले. परंतु साधारणतः पंधरा दिवसांपासून राष्ट्रवादीमध्येच दोन गट झाल्याचे पहायला मिळाले. अगदी सभागृहात या दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने, बीडकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
एकीकडे हे चित्र असतांना दोन्ही क्षीरसागर बंधू एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना बीड नगरपालिकेत सुरू असलेला गोंधळ थांबवायचा असेल, बीडचा विकास करायचा असेल तर आम्ही योग्यवेळी निर्णय घेऊ असे म्हणत एकत्र येण्याचे संकेत दिले. या सर्व घडामोडीत आता शिव,शाहू, फुले, आंबेडकर मौलाना आझाद आघाडीचे अध्यक्ष आ.विजयसिंह पंडित यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
बीडच्या जनतेने शहराच्या विकासासाठी आम्हाला संधी दिली आहे. काही गोष्टी मागच्या काळात घडल्या असल्या तरी, त्यामुळे फार काही मोठा बदल होईल असे काहीच नाही. आम्ही सर्वजण एकसंघ आहोत, पक्ष आणि पक्षाच्या भूमिकेशी आम्ही बांधील आहोत. बीडच्या नगराध्यक्षपदी प्रेमलता पारवे याच पाच वर्ष कायम राहतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, उपाध्यक्ष देखील राष्ट्रवादीचाच राहणार आणि पक्षाच्या विचारांशी तो बांधील असेल. त्यामुळे उगाच काहीतरी चर्चा करायच्या, शंका निर्माण करायची याला काही अर्थ नाही. ज्या काही चर्चा आहेत, ज्या काही शंका आहे त्या अवघ्या काही तासांत दूर होतील अशी भूमिका आ.विजयसिंह पंडित यांनी मांडली आहे.
आ. विजयसिंह पंडितांची संयमी भूमिका
बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप केले, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. यातच आ.संदीप क्षीरसागर व डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड शहराच्या विकासासाठी काही प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू म्हणत एकत्र येण्याचे संकेत दिले. या सर्व घडामोडीत आ.विजयसिंह पंडित यांनी मात्र संयमी भूमिका घेत राजकीय परिपक्वता दाखवून दिली. याबरोबरच येत्या काही तासांत चित्र स्पष्ट होईल, प्रेमलता पारवे याच पाच वर्ष अध्यक्षपदी कायम राहतील अशी ठाम भूमिका घेत विरोधकांकडून सत्तांतराचे मिळत असलेले संकेत हे केवळ चर्चेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बीड शहरात गेल्या काही वर्षांत जो काही विकासाचा अनुशेष निर्माण झाला, तो भरून काढणे आणि स्व.अजित पवार यांनी जे बीडच्या विकासाचे वचन दिले होते, ते पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या सर्व प्रक्रियेत सर्व नगरसेवक, पदाधिकारी आमच्या सोबत आहेत, त्यामुळे कोण काय प्रयत्न करतंय, कोण काय चर्चा करते याबाबत मला काही बोलायचे नाही असेही आ.पंडित यांनी म्हटले आहे.