Saurabh Kulkarni arrested
गौतम बचुटे
केज : वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील विद्यार्थ्यां व पालकांची फसवणूक करणाऱ्या महाठक सौरभ कुलकर्णी यास केज पोलिसांनी अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात डॉ. तोंडे यांची फसवणूक करून आठ लाख रुपये उकळल्याच्या प्रकरणात दि. १३ जानेवारी २०२६ रोजी कराड येथून त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई केज उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सय्यद जावेद कराडकर, अमिरोद्दीन इनामदार व अनिल मंदे यांच्या पथकाने केली.
अटकेनंतर सौरभ कुलकर्णी याचे अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. नागपूर येथील बांधकाम व्यावसायिक सतीश गुरुमुखदास लालवाणी यांच्या एमबीबीएस झालेल्या मुलीला, डॉ. दिव्या सतीश लालवाणी हिला, बेंगलोर किंवा कर्नाटकातील वैद्यकीय महाविद्यालयात रद्द झालेल्या जागेवर त्वचारोग शास्त्रातील (एमडी) पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून त्याने दि. २८ ऑक्टोबर २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ७० लाख रुपये उकळले.
मात्र, डॉ. दिव्या लालवाणी यांचे नाव मॅनेजमेंट कोट्यातील संभाव्य प्रवेश यादीत नसल्याचे समजताच फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर सतीश लालवाणी यांनी वारंवार पैसे परत मागूनही सौरभ कुलकर्णी याने टाळाटाळ केली. अखेर दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी नागपूर शहरातील जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीनुसार सौरभ कुलकर्णी (वय ३८) व त्याचे बेंगलोर येथील साथीदार के. कृष्णमूर्ती (वय ५०), अनिस नुन्ना (वय ३६) व जुनेद (वय ४५) यांच्याविरुद्ध जरीपटका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय उदगीरकर करीत आहेत.