बीड

बीड: मनकर्णिका प्रकल्पाने तळ गाठला: वीस गावांना टँकरने पाणीपुरवठा

अविनाश सुतार

[author title="रामेश्वर जाधव" image="http://"][/author]
पिंपळनेर: बीड तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरातील वीस गावांना पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. लिंबारुई देवी येथील सर्वात मोठ्या मनकर्णिका प्रकल्पाने यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तळ गाठला आहे. पाणी साठा मृत साठ्यात असल्यामुळे पाणी जपून वापरावे लागत आहे. जून महिन्यात पाऊस झाला नाहीतर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बीड तालुक्यातील मनकर्णिका व शिवणी येथील तलावात मृत साठ्यात पाणी असून इतर मैंदा, ईट, जरुड, जुजगव्हाण, मन्यारवाडीसह आदी छोटे-मोठे तलाव कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे मनकर्णिका प्रकल्पातून पिंपळनेरसह वीस गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर इतर गावांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

मागील पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून उष्णतेची लाट उसळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक घामाघूम होत आहेत. मनकर्णिका प्रकल्पात सध्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून आजतागायत प्रकल्पात मृत साठ्यात पाणी उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे नंदकिशोर खामकर यांनी दिली आहे.

पिंपळनेर परिसरात मागील आठ दिवसांपूर्वी जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यामुळे शेतीसह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. परंतु, आता तीव्र उष्णतेची लाट वाढल्याने पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे.

मनकर्णिका प्रकल्पातून पिंपळनेरसह परिसरातील २० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती बीड पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी जुबेरी यांनी दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT