Beed Kej youth punished  Pudhari
बीड

Kej News | केज येथे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यास भरचौकात कान धरून उठाबशा काढायला लावल्या; व्हिडिओ व्हायरल

केज तालुक्यातील संबंधित व्यक्तीने इंस्टाग्रामवरील आपल्या स्टेटसवर भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Beed Kej youth punished for offensive post

केज : दोन महिन्यांपूर्वी भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला केज येथे कार्यकर्त्यांनी पकडून भरचौकात कान धरून उठाबशा काढत माफी मागण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

केज तालुक्यातील संबंधित व्यक्तीने इंस्टाग्रामवरील आपल्या स्टेटसवर भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप आहे. या पोस्टमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भावना व्यक्त करत दलित चळवळीतील विविध संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

घटनेनंतर संबंधित व्यक्ती फरार होती. मात्र १७ फेब्रुवारी रोजी तो केज शहरात दिसून आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्याला गाठले. त्यानंतर भरचौकात त्याच्याकडून कान धरून उठाबशा काढून घेत माफी मागविण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून संबंधित व्यक्ती कोण, याबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १८६(१) व २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच संबंधित व्यक्तीविरुद्ध अन्य तक्रारीही दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत केजचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी इशारा दिला आहे की, “सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT