मृत विक्की चंदनशिव, मारेकरी महेश चंदनशिव Pudhari
बीड

Beed Crime | मुंबई येथील घराच्या मालकीवरून हनुमंत पिंपरी येथे चुलत भावाचा निर्घृण खून

Kej Taluka Murder Case | केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी शिवारात थरारक घटना

पुढारी वृत्तसेवा

Kej Taluka Murder Case

गौतम बचुटे

केज : केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी शिवारात सख्ख्या चुलत भावानेच आपल्या चुलत भावाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, केज पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हनुमंत पिंपरी येथील विक्की उर्फ अण्णा रावसाहेब चंदनशिव (वय २५) याचा खून त्याचाच सख्खा चुलत भाऊ महेश त्रिंबक (उत्तरेश्वर) चंदनशिव याने धारदार शस्त्राने गळा चिरून केला. ही घटना ३० जानेवारी रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश चंदनशिव याने विक्की उर्फ अण्णा याला हनुमंत पिंपरी येथील पारधी वस्तीवर दारू पाजली. त्यानंतर जेवणाच्या बहाण्याने त्याला मोटारसायकलवरून केवड येथील ढाब्यावर नेऊन पुन्हा दारू पाजली. त्यानंतर केवड व हनुमंत पिंपरी दरम्यान असलेल्या निर्जन शिवरस्त्यावर नेऊन विक्कीला गाडीवरून खाली उतरवून मारहाण केली. दारूच्या नशेत असलेल्या विक्कीच्या गळ्यावर भाजी कापण्याच्या बतईसारख्या धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. गळ्यावरील गंभीर जखमेमुळे अतिरक्तस्राव होऊन विक्कीचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

खून केल्यानंतर आरोपीने विक्कीचे प्रेत रस्त्यावर टाकून तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका शेतकऱ्याच्या निदर्शनास मृतदेह आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुप्तपणे तपास सुरू केला. अवघ्या एका तासात आरोपी महेश चंदनशिव याला ताब्यात घेण्यात आले.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटेशराम, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, लक्ष्मण कीर्तने, अमिरोद्दीन इनामदार, अशोक सोनवणे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर, बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

मुंबईहून गावी आला होता विक्की

मयत विक्की चंदनशिव हा चेंबूर, मुंबई येथून मंगळवारी हनुमंत पिंपरी येथे आपल्या आईकडे आला होता. ३० जानेवारी रोजी त्याने आईला “स्वयंपाक करून ठेव, मी जेवायला येतो,” असे सांगून घराबाहेर पडला. मात्र तो रात्री घरी परतलाच नाही. आई रात्रभर त्याची वाट पाहत होती.

अशी मिळाली आरोपीची माहिती

विक्कीची आई छाया रावसाहेब चंदनशिव यांनी ३१ जानेवारी रोजी गावात चौकशी केली असता, विक्कीला महेश चंदनशिव मोटारसायकलवरून घेऊन गेल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि तीच तपासातील महत्त्वाची कडी ठरली.

घरगुती वादातून रचला खुनाचा कट

चेंबूर, मुंबई येथील घराच्या मालकीवरून विक्की व त्याचे चुलते बाळासाहेब, उत्तरेश्वर, बबन व नागुराव चंदनशिव यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होता. याच वादातून आरोपी महेश चंदनशिव याने विक्कीचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

असा उलगडला खुनाचा तपास

खून केल्यानंतर संशय येऊ नये म्हणून आरोपीने आपल्या मोटारसायकलवरील रक्ताचे डाग धुवून टाकले होते. मात्र चौकशीदरम्यान मोटारसायकल पुसण्यासाठी वापरलेला कपडा ओला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

मयताचा एक चुलता फरार

मयत विक्कीचा एक चुलता ३० जानेवारी रोजी गावात उपस्थित होता. मात्र खुनाची माहिती मिळताच तो गावातून निघून गेला आहे. संबंधित चुलत्याच्या पत्नी मुंबईत शिक्षिका असल्याची माहिती आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, चिंचोली माळी येथे पाठवला आहे. मयताची आई छाया रावसाहेब चंदनशिव यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT