Kej Bus Stand Theft Pudhari
बीड

Beed Crime | भावाच्या लग्नासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेच्या पर्समधून साडेतीन लाखांचे दागिने लंपास: केज बसस्थानकावरील घटना

नाशिक–लातूर एसटी बसने लातूरकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना ही चोरी

पुढारी वृत्तसेवा

Kej Bus Stand Theft

केज : भावाच्या लग्नानिमित्त माहेरी जात असलेल्या एका विवाहित महिलेच्या पर्समधून केज बसस्थानकावर अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे.

केज येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या अश्विनी गोविंद घोळवे रविवारी (दि. १) दुपारी सुमारे ३.४५ वाजता नाशिक–लातूर एसटी बसने लातूरकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना ही चोरी झाली. त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यामधील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मोठ्या पट्टीचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके असा एकूण ३ लाख ३५ हजार ९८० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

दरम्यान, अश्विनी घोळवे व त्यांची मुलगी बसमध्ये चढत असताना त्यांच्या आजूबाजूला दोन अनोळखी महिला व एक मुलगी संशयास्पदरीत्या घुटमळत असल्याचे त्यांनी सांगितले असून, याच महिलांनी पर्समधील दागिने चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी अश्विनी घोळवे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने करीत आहेत.

दरम्यान, केज बसस्थानक परिसरात पोलीस चौकी असतानाही पुरेशा मनुष्यबळाअभावी गस्त कमी असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. बसस्थानक परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी तसेच संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT