Kaij Tahsil Office Protest Pudhari
बीड

Kaij Farmer Protest | केज तहसील कार्यालयावर शेकापचा बैलगाडी मोर्चा

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत आणि २०२५ चा पीकविमा तातडीने द्या : भाई मोहन गुंड यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Kaij Tahsil Office Protest

केज : बीडसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके करपून गेली आहेत. खत, बियाणे आणि शेतीच्या मशागतीसाठी मोठा खर्च करूनही उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नाही. त्यातच २०२५ च्या खरीप व रब्बी हंगामाचा पीकविमा अद्याप मिळालेला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २१) केज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मंगळवार पेठ मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देणे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे आणि २०२५ च्या खरीप व रब्बी हंगामाचा प्रलंबित पीकविमा त्वरित वितरित करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच शेतीपंपांचे व घरगुती वीजबिल संपूर्ण माफ करावे, शेतीपंपांसाठी किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करावा आणि स्मार्ट मीटर सक्तीने बसविणे थांबवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. केज शहरालगतच्या शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मोर्चात भाई मोहन गुंड, हनुमंत भोसले, भाई अशोक रोडे, रामलिंग पाटील, मंगेश देशमुख, बाबाराजे गायकवाड, शाम चिंचोलीकर, दिगांबर मगर, महेश गायकवाड, दिनकर अण्णा भोसले, अनिल गलांडे, अण्णा नखाते, किशोर सुरवसे, संतोष भोसले, हनुमंत चाळक आणि अंगद ससाणे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT