गोरख हजारे, अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे Pudhari
बीड

Beed Crime | केज येथील गोरख हजारे खूनप्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप

केज अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय; ३० हजार रुपये दंडाचीही शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

Kaij Sunny Landge Sentenced To Life

केज : केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणात आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला ३० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास केज येथील वसंत विद्यालयाजवळील क्रांतीनगर परिसरात गोरख महावीर हजारे (वय १८) आणि अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. यावेळी आरोपीने गोरख हजारे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर काही वेळाने अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याने शर्टमध्ये लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने गोरख हजारे यांच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोरख यांना नातेवाईकांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मयत गोरख हजारे यांचे नातेवाईक राज संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२८/२०२४ नुसार भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी केज येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले आणि आर. के. शेख यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पुरावे तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.

सहाय्यक सरकारी वकील ॲड. राम बिरंगळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे (रा. क्रांतीनगर, केज, जि. बीड) याला भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील ॲड. राम बी. बिरंगळ यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना सहाय्यक सरकारी वकील ॲड. रविकुमार उदार आणि पैरवी पोलीस कर्मचारी रमा भालेराव यांनी सहकार्य केले.

आरोपीला शेतातून घेतले होते ताब्यात

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याला बोबडेवाडी येथील शेतातून ताब्यात घेतले होते. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आनंद शिंदे, वैभव सारंग तसेच पोलीस कर्मचारी श्रीकांत चौधरी, रुक्मिणी पाचपिंडे, बाळासाहेब अहंकारे, संतोष गित्ते, सचिन अहंकारे, शेख मतीन, प्रकाश मुंडे आणि चालक संभुदेव दराडे यांनी सहभाग घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT