

केज : ज्याच्यावर व्यवहाराचा विश्वास ठेवला, त्यानेच तिजोरीवर डल्ला मारला..." अशीच संतप्त प्रतिक्रिया केज येथील व्यापारी वर्गातून उमटत आहे. केज येथील एका आडत दुकानात गेल्या तीन वर्षांपासून विश्वासाने काम करणाऱ्या मुनीमाने मालक उपचारासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत सह्या करून ठेवलेल्या धनादेशांचा गैरवापर करून तब्बल ३४ लाख रुपये स्वतःच्या खात्यावर वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता, त्याने दुसऱ्या व्यापाऱ्याच्याही लाखो रुपयांच्या सोयाबीनची परस्पर विक्री करून रक्कम घेऊन पसार झाल्याची माहिती समोर आल्याने केजची व्यापारी पेठ हादरली आहे.
केज येथील व्यापारी हाजी मौला सौदागर यांच्या सौदागर ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानात शेख शफिक शेख अतिक (वय ३५, रा. धारूर) हा ऑक्टोबर २०२२ पासून मुनीम म्हणून कार्यरत होता. धान्य खरेदी-विक्री, व्यवहाराची नोंद, बँकेत पैसे जमा करणे, धनादेशांची देवाण-घेवाण अशा सर्व आर्थिक व्यवहारांची जबाबदारी त्याच्याकडे होती. तीन वर्षांच्या कालावधीत त्याने प्रामाणिकपणे काम करत मालकाचा पूर्ण विश्वास संपादन केला होता.
मात्र, हाच विश्वास त्याने फसवणुकीसाठी वापरल्याचा आरोप आहे. १७ जून रोजी हाजी मौला सौदागर हे पाठीच्या मणक्याच्या उपचारासाठी पत्नी व मुलासह राजस्थानातील जोधपूर येथे गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलगा जिशान याला देण्यासाठी चार धनादेशांवर स्वाक्षऱ्या करून ते कपाटात ठेवण्यास शफिक कडे दिले होते. याच धनादेशांचा गैरवापर करत शफिकने अनुक्रमे ८ लाख, ८ लाख, १० लाख आणि ८ लाख, अशी एकूण ३४ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या 'कोहिनूर स्टील' या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा केली. त्यानंतर त्या खात्यातील काही रक्कम स्वतःच्या इतर खात्यांमध्ये तसेच आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शेख शफिक हा मैमुना खालेद शेख (रा. चेंबूर, मुंबई) यांच्या सौदागर ट्रेडर्स या अडत दुकानातही आर्थिक व्यवहार सांभाळत होता. तेथील ५०० ते ६०० पोती सोयाबीन परस्पर विकून ३० ते ४० लाख रुपयांची रक्कम घेऊन तो पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांकडून स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
हाजी मौला सौदागर यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ व ३१८ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख पुढील तपास करीत आहेत.
बँक व्यवस्थापकाच्या एका फोनने उघड झाला घोटाळा
या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले ते २३ जून रोजी. शाहू को-ऑपरेटिव्ह बँकेच्या धारूर शाखेच्या व्यवस्थापकांनी हाजी मौला सौदागर यांना फोन करून, "तुमच्या खात्यातून चार धनादेशांद्वारे ३४ लाख रुपये एका खात्यावर वर्ग झाले आहेत, हे व्यवहार तुम्हीच केले आहेत का?" अशी विचारणा केली. हा फोन येताच सौदागर यांना धक्काच बसला. उपचार आटोपून ते २७ जून रोजी केजला परतले. त्यांनी शफिकचा शोध घेतला असता तो केज आणि धारूर येथून फरार झाल्याचे समोर आले.