गौतम बचुटे
केज: तालुक्यातील हॉटेल चालक विलास घुले यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर, न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या भावाने केलेल्या आंदोलनावरून सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब पाथरकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
केज-बीड रोडवरील टाकळी फाटा येथील 'हॉटेल गावकरी' येथे दि. २० जून रोजी काही लोक विलास घुले यांच्या मित्राला मारहाण करत होते. त्या इसमाला वाचवण्यासाठी विलास घुले धावले असता, जमावातील एकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आणि २१ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायाच्या मागणीसाठी रस्ता रोको व ठिय्या आंदोलन केले होते.
सोशल मीडियावरून बदनामी करणारे मेसेज व्हायरल
या आंदोलनादरम्यान, बाळासाहेब पाथरकर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रमेश घुले आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करणारे मेसेज व्हायरल केले. रमेश घुले यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पाथरकरने आपल्या पोस्टमध्ये रमेश घुले यांना 'गुंड', 'चोर' आणि 'बलात्कारी' असे संबोधून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला. तसेच, "रमेश घुले याने आपल्या भावाचे प्रेत शिवाजी चौकात ठेवून विटंबना केली," अशा आशयाचे खोटे आणि प्रक्षोभक मेसेज प्रसारित करून समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला.
पोलीस कारवाई
रमेश घुले यांच्या तक्रारीवरून केज पोलिसांनी बाळासाहेब पाथरकर याच्या विरुद्ध भा. न्या. सं. कलम ३५३(१) आणि ३५६(२) नुसार अदखलपात्र गुन्हा (गु. र. नं. ६६१/२०२६) दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.