

गौतम बचुटे
केज : विलास घुले खून प्रकरणात पुरवणी जबाबात नाव आल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे हे आज (दि. २७ जून) दुपारी १२:०० वाजता स्वतः एसआयटीचे व्यंकटराम यांच्या कार्यालयात हजर झाले आहेत.
दि. २० जून रोजी दोन गटातील भांडण सोडवायला गेलेले हॉटेल मालक विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार केल्याने (दि. २१ जून) विलास घुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात नऊ आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान मयत विलास घुले यांचे भाऊ आणि या घटनेतील फिर्यादी रमेश घुले यांनी (दि. २३) रोजी दिलेल्या पुरवणी जबाबात बीड जिल्ह्याचे खा. बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचाही या प्रकरणाशी सबंध असल्याचा पुरवणी जबाब दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
विलास घुले खून प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने एसआयटी गठित करण्यात आली आहे. त्या एसआयटी पथकाचे प्रमुख आयपीएस अधिकारी व्यंकट राम यांनी दि. २६ जून रोजी दुपारी केज येथील पवनसुत निवासस्थानी जाऊन तपासणी केली होती. त्यानंतर सौरव सोनवणे हे आज (दि. २७ ) दुपारी ११:३० वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केज येथील एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम यांच्या समोर चौकशीला हजर झाले आहेत.