गेवराई : गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार ट्रॅक्टर, एक केन्या आणि वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. एकाला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई आज (दि. २३) पहाटेच्या सुमारास एलसीबीच्या पथकाने खामगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात केली. अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने तातडीने छापा टाकून ही कारवाई केली. अंधाराचा फायदा घेत काही जण पळून गेले, मात्र पोलिसांनी एका आरोपीला रंगेहाथ पकडले.
२३ लाखांचा मुद्देमाल जप्त
ताब्यात घेतलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे २३ लाख रुपये आहे. यामध्ये ट्रॅक्टर, केन्या, आणि वाळूचा साठा यांचा समावेश आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी अटकेत असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या कारवाईचे नेतृत्व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे यांनी केले. त्यांच्यासह पथकाने समन्वयाने धडक टाकत ही यशस्वी कारवाई केली.
अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांचा मोठा मोहीम सुरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या व जनतेच्या संसाधनांवर अतिक्रमण करणाऱ्या अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल. अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या माफियांना कोणतीही गय दिली जाणार नाही.- नवनीत कान्वत पोलिस अधीक्षक
या कारवाईमधून प्रशासनाने वाळू माफियांना स्पष्ट संदेश दिला आहे की, अंधाराचा फायदा घेणारे आता सुरक्षित नाहीत. कोणतीही राजकीय किंवा आर्थिक छत्रछाया न बघता पोलीस दल कठोरपणे पावले उचलत आहे. अशा अवैध कारवायांपासून दूर राहा, अन्यथा पकड झाली तर थेट तुरुंग हाच पर्याय राहील.