केज :- पीकविमा भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या एका वृद्धाच्या अंगावर खाज सुटणारे व त्रास होणारा पदार्थ टाकून त्याच्या जवळील पैसे ठेवलेले पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबविली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २१ जुलै रोजी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील गंगाराम वामन सरवदे हे ७१ वर्षे वयाचे वृद्ध शेतकरी पीक विमा भरण्यासाठी केजला आले होते. त्यांनी कळंब रोड येथील आयडीबीआय बँकेतून दुपारी १२:३० वा. सुमारास त्यांच्या बचत खात्यावर असलेले ८ हजार रूपये काढले. ते पैसे एका निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून पिशवी हातात घेऊन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील चौकात आले असता पाठी मागुन त्यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने अंगाला खाज सुटून आग होणारा पदार्थ टाकला. त्यामुळे गंगाराम सरवदे यांनी हातातील पिशवी खाली ठेवुन जवळच्या दुकानात शर्ट काढुन झटकण्यासाठी गेले. त्याच वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची पैशासह पिशवी चोरुन नेली.
गंगाराम सरवदे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ४००/२०२५ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस जमादार पल्लवी तरकसे या करीत आहेत.