केज : तालुक्यातील एका अल्पशिक्षित युवा शेतकऱ्याने त्याच्या अर्ध्या एकर पेक्षा कमी क्षेत्रात घेवडाचे सुमारे पाच लाखाचे उत्पन्न घेतले आहे. याशिवाय त्याने या पिकात दोन अंतर पिके सुद्धा घेतली आहेत. त्याचेही सुमारे दीड लाखाचे उत्पन्न मिळाले असून आणखी तीन ते चार लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
केज तालुक्यातील एका अल्पशिक्षित युवा शेतकरी भागवत मुळे यांनी त्याच्या अवघ्या अर्ध्या एकर पेक्षा कमी क्षेत्रात त्यांनी घेवडा लावला होता. त्याला व्यवस्थित खत आणि पाण्याचे नियोजन करून वेलीला आधार देण्यासाठी बाबूंच्या काठ्या आणि तारेची बांधणी केली. त्यानंतर सुमारे ६० ते ७५ दिवसात त्याला फुले लागली.एका आठवड्याला सुमारे दहा क्विंटल म्हणजेच एक टन एवढा घेवडा मिळत असून शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील बाजारपेठेत व्यापाऱ्याकडून त्यांच्या वाणाला चांगली मागणी आहे. आता पर्यंत सुमारे २०० क्विंटल म्हणजेच २० टनाच्या आसपास घेवड्याचे उत्पन्न मिळाले असून प्रति क्विंटल ४ हजार ते ६ हजार असा भाव मिळाला आहे. चार महिन्यापासून याची विक्री सुरू आहे.
या घेवड्याच्या पट्ट्यामध्ये त्यांनी प्रथम कोबीचे पीक घेतले. कोबीने त्यांना सुमारे ४० हजार रूपये मिळवून दिले. कोबी निघाल्यानंतर या घेवड्याच्या पिकांत त्यांनी कोथिंबीर लावली आणि कोथिंबीरला विक्रमी भाव मिळाला. सुमारे १५० ते २०० रूपये किलो दराने त्यांनी कोथंबीर विकली. त्या कोथिंबीरीचे देखील त्यांना ७५ हजार ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
आता कोथिंबीर संपली आता त्याच पिकात वाटाणा पिकाची लावणी करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्यातून सुद्धा चांगले उत्पन्न मिळू शकते.
चिकाटी, मेहनत आणि चालू घडामोडीचा अंदाज घेऊन पिकाची निवड केली तर चांगले उत्पन्न मिळतेभागवत मुळे, शेतकरी