

Farmers compensated heavy rain agriculture damage
कडा, पुढारी वृत्तसेवाः अतिवृष्टी, गारपिटी आणि सततच्या हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकं पाण्याखाली गेली, शेतातील मेहनत वाया गेली, पण सर्वांत मोठी वेदना म्हणजे पंचनाम्यात झालेली अन्यायकारक वागणूक. अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान झाले असतानाही महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले पण त्यात अर्थकारण दिसून आले, तर काही ठिकाणी 'ओळख' आणि तोंड पाहूनच नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवले गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
काही गावांमध्ये तर शेतकऱ्यांनी तक्रारी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे प्रकार समोर आले आहेत. निसर्गाचा कोप पुरेसा नव्हता का? आता प्रशासनाचाही अन्याय सहन करावा लागत आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना अधिकारी फाईलवरच पंचनामे करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
खरी नुकसानग्रस्तांना शेतं वंचित ठेवून काही निवडकांना लाभ देण्याचं काम सुरू आहे, असा आरोप करत तातडीने चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. नुकसान झालं आमचं, पण भरपाईचा लाभ इतरांना होतो मग आम्ही दाद मागायची कोणाकडे?
महसूल व कृषी प्रशासनाच्या या कारभारा विरोधात शेतकरी संताप व्यक्त करत आहे न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावांमध्ये एकाच शेतकऱ्याचे फोटो वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यात वापरल्याचे चर्चा आहे.
या प्रकारामुळे पंचनाम्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून शेतकरी वर्गात तीव्र नार-ाजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तर तोच फोटो एका पंचनाम्यात कपाशीचे नुकसान दाखवतो, तर दुसऱ्या ठिकाणी तोच फोटो नुकसान दाखवताना दिसतो.
यामुळे खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळेल का, असा सवाल शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आष्टी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.