बीड, ः लग्नासाठी उताविळ झालेल्या तरुणांना फसवणार्या टोळीने एका महिलेचे एकाच महिन्यात तीन वेळेस लग्न लावल्याचा प्रकार आष्टी तालुक्यात समोर आला आहे. यानंतर ही टोळी या महिलेचे चौथे लग्न लावण्याच्या तयारीत असतांना या महिलेने मानसिक छळाला कंटाळून शुक्रवार दि.6 मार्च रोजी विष प्राशन केले असून तिच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरुन पुणे व तुळजापूर येथील चार संशयीतांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर येथील रहिवासी असलेल्या या पीडित तरुणीचा पहिला विवाह बीड येथील एका तरुणाशी दोन वर्षांपूर्वी कंकालेश्वर मंदिरात झाला होता, मात्र पतीच्या वाईट वर्तणुकीमुळे ती माहेरी लातूर येथे राहत होती. परंतु या महिलेला ज्या आजोबांचा आधार या महिलेला होता, त्यांचे निधन झाल्याने तिचा आधार गेला होता. यामुळे सदर महिला दुसरे लग्न करण्याच्या विचारात होती. याच काळात लातूर येथील संगीता नावाच्या महिलेने तिची भेट हडपसर पुणे येथील महानंदा नावाच्या एजंटशी करवून दिली.
या महानंदाने दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून पीडितेला पुण्याला नेले आणि तेथे 5 लाख रुपये घेऊन अमर काळभोर नावाच्या व्यक्तीशी तिचे बळजबरीने लावून दिले. अवघ्या दहा दिवसांतच तिला तिथून घेऊन आले व कुरकुम येथील एका व्यक्तीसोबत लग्न लावण्यात आले. त्याच्याकडून साडेचार लाख रुपये घेतले. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात महानंदाने पुन्हा या महिलेला घरी आणले.
यानंतर महानंदाने तुळजापूर येथील एका महिलेच्या मदतीने 4 मार्च 2026 रोजी आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील एका व्यक्तीशी पीडितेचे तिसरे लग्न लावून पुन्हा साडेचार लाख रुपये लाटले. या छळाचा कळस तेव्हा गाठला गेला जेव्हा 6 मार्च रोजी पीडितेला पुन्हा फोन करून चौथ्या लग्नासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले. वारंवार होणारी ही विक्री आणि भविष्यातील अत्याचाराच्या भीतीने पीडिता प्रचंड मानसिक दबावाखाली आली आणि तिने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन केले.
सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आष्टी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित महानंदा, तिथा पती आणि तुळजापूर येथील अन्य दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 आणि 61 अन्वये मानवी तस्करी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शरद ज्ञानदेव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
चार जण पुणे, तुळजापुरमधील
या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरुन लग्न लावून देणारी महिला महानंदा, महानंदाचा मालक, बालिका व बालिकाचा पती अशा चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय श्रीकृष्ण शिंदे हे करत असून या आरोपींना अटक केल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल असे त्यांनी सांगितले.