

कावेरी गिरी
लग्न ही भारतीय समाजातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची संस्था मानली जाते. दोन व्यक्तींच्या आयुष्याचा हा निर्णय असला, तरी प्रत्यक्षात तो दोन कुटुंबांचा, त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि सामाजिक नातेसंबंधांचा विषय ठरतो; मात्र गेल्या काही वर्षांत या लग्नसंस्थेभोवती अस्वस्थता, तणाव आणि फसवणुकीची छाया अधिक गडद होत चालली आहे. आज अनेक घरांमध्ये लग्न जमलं नाही, यापेक्षा लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाली, अशी चर्चा ऐकू येऊ लागली आहे.
गेल्या दोन दशकांत समाजात मुलींची संख्या चिंताजनकरीत्या घटलेली आहे. मुलगा हवाच ही मानसिकता, भ्रूणहत्या, शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक असुरक्षितता यामुळे लिंग गुणोत्तर बिघडत गेले. त्याचा थेट परिणाम आज विवाहाच्या बाजारपेठेवर दिसून येतो. अनेक ठिकाणी मुलींची संख्या कमी आणि मुलांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, आज अनेक मुलांना लग्नासाठी योग्य मुलगी मिळणे कठीण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ही समस्या अधिक तीव्रतेने जाणवते. मुलाचे वय वाढत चालले की, पालकांची चिंता वाढते. समाजाचा दबाव, नातेवाईकांचे टोमणे, शेजार्यांच्या कुजबुजत्या चर्चा या सार्यामुळे पालक मानसिकद़ृष्ट्या अस्वस्थ होतात. मुलाचं काहीतरी बिनसलंय का किंवा एवढं वय होऊनही लग्न का होत नाही, असे प्रश्न सतत ऐकावे लागतात. या परिस्थितीत मुलगे आणि त्यांचे पालक लग्नासाठी अक्षरशः आसुसलेले दिसतात. हीच अस्वस्थता अनेकदा त्यांना चुकीच्या निर्णयाकडे ढकलते.
मुलींची संख्या कमी असल्याने मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, हे वास्तव नाकारता येत नाही. चांगले शिक्षण, पक्की नोकरी, भरघोस पगार, स्वतःचे घर, शहरातील स्थायिकता अशी मुलीच्या अपेक्षांची यादी मोठी आहे. अपेक्षा असणे चुकीचे नाही; पण त्या वास्तवाशी विसंगत ठरू लागल्या की, अडचणी निर्माण होतात. अनेक प्रकरणांत मुलगे किंवा त्यांचे पालक या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यामुळे चांगली स्थळे नाकारली जातात. परिणामी, लग्न जमत नाही, वय वाढते आणि नैराश्य अधिक गडद होत जाते. याच टप्प्यावर विवाह ठरवणारे दलाल, मध्यस्थ आणि तथाकथित मॅट्रिमोनियल सल्लागार मैदानात उतरतात. नक्की स्थळ आहे, मुलगी तयार आहे, फक्त थोडे पैसे लागतील अशी आमिषे दाखवून ते असहाय्य पालकांना जाळ्यात ओढतात. आज लग्नाला मुली मिळत नसल्याने या दलालांचे चांगलेच फावले आहे. काही जण स्वतःला समाजसेवक म्हणून मांडतात, तर काही जण ऑनलाईन माध्यमांचा वापर करून बनावट प्रोफाईल्स तयार करतात. पालकांची घाई, मुलाचे वाढते वय आणि सामाजिक दबाव या सार्यांचा ते कुशलतेने फायदा घेतात.
लग्न हे आता फसवणुकीसाठी लबाडांना उपलब्ध झालेले नवे क्षेत्र बनले आहे. खोटे फोटो, बनावट कागदपत्रे, खोटी नोकरी, लपवलेला घटस्फोट किंवा आजार अशा अनेक युक्त्या वापरून फसवणूक केली जाते. काही प्रकरणांत लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच नवरी दागिने आणि पैसे घेऊन गायब होते. काही ठिकाणी संपूर्ण टोळीच अशा फसवणुकीसाठी काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकार ऐकताना धक्का बसतो; पण त्यांची संख्या वाढत असल्याचे वास्तव अधिक अस्वस्थ करणारे आहे. ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबाने दलालावर विश्वास ठेवून मोठी रक्कम खर्च केली. लग्न मोठ्या थाटामाटात झाले; पण आठवडाभरातच नवरी दागिने घेऊन पसार झाली. शहरातील एका नोकरदार मुलाशी आयटी कंपनीतील नोकरी असल्याचे सांगून लग्न लावण्यात आले. नंतर समजले की, ती मुलगी याआधीही अशाच पद्धतीने दोन वेळा फसवणूक करून गायब झाली होती. अशी उदाहरणे आज अपवाद राहिलेली नाहीत, हीच या समस्येची गंभीरता दर्शवते.
अशाप्रकारची फसवणूक झाल्याचे मागील काही महिन्यांत समोर आले आहे. परभणी शहरात लग्न जुळवण्याच्या नावाखाली पुण्यातील एका कुटुंबाची तब्बल 3 लाख 25 हजारांची आर्थिक फसवणूक झाली होती. बनावट नवरी दागिन्यांसह फरार झाली. त्यामुळे सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली मोठी प्लॅनिंग करून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. लग्नानंतर नवरा-नवरी कारमधून पुण्याकडे रवाना करण्यात आले; मात्र त्यांच्या मागे आणखी एक गाडी होती, जी पाठलाग करत आली होती. नवरदेव आणि मंडळी चहासाठी थांबले आणि हीच संधी साधून नववधूने पळ काढला. नवरी न सापडल्याने पोलिस ठाणे गाठले; पण नवरी फरार झाल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यामुळे पाठलाग करणारी गाडी नववधूला नेण्यासाठीच आली होती, हे समोर आले. तपासाअंती पोलिसांनी दोन महिला एजंटना पकडले. यातून निष्पन्न झाले की, ग्रामीण भागातील तरुण-तरुणींच्या लग्नाच्या अडचणीचा फायदा घेऊन फसवेगिरी करणार्या टोळ्यांपासून सावध राहणे फारच आवश्यक आहे.
या परिस्थितीवर उपाय शोधायचे असतील, तर केवळ कायद्याकडे बोट दाखवून चालणार नाही. विवाहपूर्व सखोल चौकशी, कागदपत्रांची तपासणी आणि घाई न करता निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. समाजानेही लग्न म्हणजे व्यवहार नव्हे, हे पुन्हा एकदा लक्षात घेण्याची गरज आहे. फसवणूक झाल्यास लाज न बाळगता तक्रार दाखल केली पाहिजे, जेणेकरून इतर कुटुंबे सावध होतील. सर्वांत महत्त्वाचा आणि दीर्घकालीन उपाय म्हणजे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे. आजही जात, पोटजात, गोत्र आणि सामाजिक स्तर यांच्या भिंती विवाहासमोर उभ्या आहेत. या भिंती काही प्रमाणात शिथिल झाल्या, तरी मुलींच्या कमतरतेची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. समाजाने मनाने बदल स्वीकारल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.
लग्नाच्या नावाखाली होणारी फसवणूक ही आपल्या सामाजिक अपयशाचीच निशाणी आहे. मुलगी ओझे नाही आणि मुलगा सौदा नाही, हे आपण वेळेत समजून घेतले नाही, तर येणार्या काळात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करेल. आत्मपरीक्षण, सामाजिक जाणीव आणि मानवी संवेदनशीलता हाच या सगळ्यावर खरा आणि टिकाऊ उपाय आहे.