अखेर रहस्य उलगडले : सवतीच्या भावानेच केला होता गोळीबार Pudhari Photo
बीड

Beed Crime|अखेर रहस्य उलगडले : सवतीच्या भावानेच केला होता गोळीबार

शनिवारी रक्षाबंधन दिवशी घडली होती घटना : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : गेवराई पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात शनिवारी (ता. ९) झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा खरा प्रकार उघडकीस आला आहे. जखमी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सवतीच्या भावानेच गोळीबार केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहागड (ता. अंबड) येथील शितल भोसले या पती संदीप भोसले यांच्यासह ७ ऑगस्ट रोजी खामगाव (ता. गेवराई) येथे आल्या होत्या. रक्षाबंधनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी दाम्पत्य राखी खरेदीसाठी गेवराईत आले होते. खरेदी आटोपून परत जात असताना सवत रुचिका भोसले भेटली आणि दोघींमध्ये वाद झाला.

सायंकाळी सुमारे सात वाजता पांढरवाडी फाट्यावर हा वाद चिघळला. सवत रुचिका हिचा भाऊ शावरी (साव-या) काळे, अतुल (गुड्डू) काळे, बहीण नाथा काळे आणि बंदु चव्हाण घटनास्थळी आले. त्यांनी शितलला “तु माहेरी जा, नाहीतर तुझ्यासह तुझ्या मुलाला ठार मारू” अशी धमकी देत मारहाण केली. पती संदीप हाही मारहाणीत सामील झाला.

दरम्यान, शावरी काळे याने गावठी बंदुकीतून शितलवर गोळी झाडली. गोळी लागून ती जखमी झाली. त्यानंतर पती संदीप आणि सवत रुचिका यांनी तिला दुचाकीवरून बीड जिल्हा रुग्णालयात नेले. पोलिसांनी नंतर छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन शितलचा जबाब नोंदवला. त्यात तिने सांगितले की, पती आणि सवतीच्या दबावामुळे सुरुवातीला खरी माहिती दिली नाही. मात्र प्रत्यक्षात गोळीबार सवतीच्या भावाने केल्याचे तिने स्पष्ट केले.

या प्रकरणी पती संदीप ईश्वर भोसले, सवत रुचिका संदीप भोसले, शावरी काळे, अतुल नवनाथ काळे, नाथा नवनाथ काळे आणि बंदु भांड्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT