

Youth caught with pistol in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवाः कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल लावून सार्वजनिक ठिकाणी थांबलेल्या सागर ऊर्फ सनी प्रकाश मोरे (वय २४) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने सदरील पिस्तूल वैभव वराट आणि रितेश वडमारे यांच्याकडून घेतल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तिघांविरुध्द बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी जिल्ह्यात अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्याविरूध्द कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले आहेत. दि.९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार खासबाग लेंडी रोडच्या उपविभागीय वनकार्यालयाच्या गेटसमोर एक इसम कंबरेला गावठी कट्टा लावून कोणाची तरी वाट पाहत थांबल्याची माहिती मिळाली.
पोलीसांनी तात्काळ त्याठिकाणी उभ्या असलेल्या सागर उर्फ सनी प्रकाश मोरे (वय २४ रा. खडीक्रशरच्या बाजूला, जुना धानोरा रोड, जिजाऊ नगर बीड) याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे ४० हजार रूपये किंमतीचे पस्तुल मिळून आले.
पोलीसांनी या पिस्तुल विषयी विचारले असता वैभव संजय वराट (रा. चक्रधर नगर बीड) व रितेश प्रभाकर वडमारे (रा. राजुरीवेस बीड) या दोघांनी दिल्याचे सनी मोरे याने सांगितले. त्यानुसार पोलीसांनी सागर उर्फ सनी मोरे, वैभव संजय वराट आणि रितेश प्रभाकर वडमारे या तिघांविरूध्द बीड शहर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोनि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, पो.ह. विकास राठोड, आनंद म्हस्के, राहुल शिंदे, अंकुश वरपे, मनोज परजणे, अशफाक सय्यद, अर्जुन यादव यांनी केली.